आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिका-यांची दिरंगाईमुळे नवजात बाळ दगावले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - गदाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल केलेल्या महिलेचे नवाजात बाळ दगावले. त्यामुळे महिलेच्या नातेवाइकांनी आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा जीव गेल्याचे सांगत हलगर्जी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा तसेच तहसीलदार अनिता भालेराव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गुन्हा दाखल न केल्यास गदाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास टाळे ठोकण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
गीता पांडे या महिलेस गदाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी सकाळी तिचे वडील बबन दीक्षित, आई ललिता दीक्षित व पती राजेंद्र पांडे यांनी दाखल केले होते. या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार गीताला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आणल्यावर या ठिकाणी कोणताही वैद्यकीय अधिकारी किंवा आरोग्य सेविका उपस्थित नव्हती. अखेरीस मोबाइलवर संपर्क साधून वैद्यकीय अधिका-यांना बोलावण्यात आले. परिचारिका उपस्थित नसल्याने गीताचा त्रास वाढू लागला. ती बराच वेळ वेदनांनी त्रस्त झाली होती. तीन तासानंतर कर्मचारी दखल झाले.
त्यानंतर गीताची तपासणी केली असता तिची स्थिती आरोग्य केंद्रात प्रसूती करून घेण्यासारखी नसल्याचे सांगत तिला औरंगाबादेतील रुग्णालयात हलवण्याचे तिच्या नातेवाइकांना सांगण्यात आले. दिवसभर आरोग्य केंद्रात ताटकळत बसलेल्या गीताच्या नातेवाइकांनी गीताला तातडीने औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात संध्याकाळी दाखल केले. परंतु यामध्ये वेळ जास्त गेल्याने गीताची प्रसूती झाल्यानंतर तिचे बाळ मात्र जगू शकले नाही.
या सर्व प्रकारानंतर केवळ आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच आपले बाळ दगावल्याचा राग गीताच्या नातेवाइकांना आल्याने त्यांनी बुधवारी गदाना आरोग्य केंद्र गाठून येथील आरोग्य अधिका-याला याबाबत जाब विचारला व आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचा-यांच्या विरोधात तहसीलदार व तालुका आरोग्य अधिका-यांकडे तक्रार करून कर्तव्यात हलगर्जी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास गुरुवारी गदाना प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे
ठोकण्याचा इशाराही शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गणेश अधाने, हेमंत दीक्षित, आकाश हिवर्डे, गणेश वाकळे, राजू ठेंगडे
यांच्यासह शिवसैनिकांनी व गीताच्या नातेवाइकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
अधिका-यांनी केली चौकशी
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. एच. बाविस्कर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत प्रकरणाची चौकशी केली. या ठिकाणी असलेल्या आरोग्यसेविका बबिता अभंग यांना खुलताबाद येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्यसेविका एम. एस. जळकोटे यांना ताजनापूर, बाजारसावंगी आरोग्य उपकेंद्रात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी शैलजा कुप्पास्वामी यांनी सांगितले.
महिलेच्या भावावर गुन्हा दाखल
गदाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या आरोग्यसेविका बबिता अभंग यांनी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेच्या दोन्ही भावांविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल खुलताबाद पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून याबाबत भूषण दीक्षित व हेमंत दीक्षित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी महिलेच्या नातेवाइकांनी जाब विचारण्यासाठी आरोग्य केंद्र गाठले असता या वेळी उपस्थित आरोग्यसेविका बबिता अभंग यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली होती.
केंद्राचा खेळखंडोबा
मी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची संपूर्ण तपासणी केली होती. नवजात बाळाचा या आरोग्य केंद्रात जीव गेला नसून औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात बाळाचा जीव गेला आहे. महिलेच्या नातेवाइकांना वैद्यकीय अधिकारी बाविस्कर यांनीच तक्रार दाखल करण्यास सांगितले असून या अधिका-यामुळेच केंद्राचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे आम्ही सर्व कर्मचा-यांनी जिल्हा आरोग्य अधिका-यांकडे आरोग्य अधिकारी बावस्कर यांची बदली करण्यात यावी यासाठी तक्रार दिली आहे.एम. एस. जळकोटे, आरोग्यसेविका.
अधिका-यांची हलगर्जी
बहिणीला प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रात आणले असता या ठिकाणी वैद्यकीय अधिका-यांसह कोणतीही परिचारिका उपस्थित नव्हती. वेळ निघून गेल्यानंतर अधिकारी व परिचारिका हजर झाले. हलगर्जीपणामुळे माझ्या बहिणीच्या बाळाचा जीव गेला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा गुरुवारी आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्यात येईल.
हेमंत दीक्षित, महिलेचा भाऊ.
आरोग्यसेविकेस नोटीस
आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिका-यांसह पाच कर्मचारी आहेत. मंगळवारी प्रसूतीसाठी आलेली महिला दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान आली होती. मात्र, या वेळी कामावर रुजू असलेली आरोग्यसेविका काही कामानिमित्त बाहेर गेली असल्याने मी स्वत: रुग्णाची तपासणी केली. त्या महिलेची स्थिती आरोग्य केंद्रात प्रसूती करून घेण्यासारखी नसल्याने मी त्यांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. या वेळी कामावर हजर नसणा-या आरोग्यसेविका एम. एस. जळकोटे यांना नोटीस देण्यात येईल.
के. डी. बावस्कर, वैद्यकीय अधिकारी गदाना.