आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Police Commissioner No Political Willingness In Immersion

विसर्जन मिरवणूकीत आयुक्तांच्या दणक्याने राजकीय निरुत्साह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत राजकीय निरुत्साह जाणवला. शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी या पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत कामापुरतीच हजेरी लावली. गतवर्षी विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने झाडून सारे नेते तसेच सामान्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनेकांना तंबी दिल्याने काही पदाधिकारी अलिप्त राहिल्याची चर्चा आहे.

विसर्जन मिरवणुकीत सर्वच पक्षांचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी सहभागी होतात. गतवर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट होते; परंतु त्याचा परिणाम जाणवला नाही. यंदाही दुष्काळ कायम आहे. मात्र, या वेळी राजकीय निरुत्साह मोठ्या प्रमाणावर जाणवला. खासदार चंद्रकात खैरे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, महापौर त्र्यंबक तुपे, सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे या मंडळींनी संस्थान गणपती या मानाच्या गणपतीची आरती करणे नंतर सिटी चौक किंवा गुलमंडीवर हजेरी लावून टीव्ही समोर बसणे पसंत केल्याचे दिसून आले. यात जैस्वाल तनवाणी हे कौटुंबिक कारणामुळे जास्त वेळ मिरवणुकीत दिसले नाहीत. भाजपचे आमदार अतुल सावे हे आपल्या पूर्व विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून होते. त्याचबरोबर भाजपचे अन्य पदाधिकारीही आपापल्या वाॅर्डातच बसून होते. काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी तर मिरवणुकीकडे फिरकलेच नसल्याचे समजते.

असे का झाले, याचा कानोसा घेतला असता यामागे पोलिस आयुक्त फॅक्टर असल्याची चर्चा होती. अमितेशकुमार यांनी प्रमुख गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून रस्त्यावर थांबायचे नाही, वेळेत विसर्जन झाले पाहिजे, मिरवणुकीत सहभागी झालेल्या भक्तांनी दारू प्यायलेली नसावी, यातील एकाही नियमाचे उल्लंघन झाल्यास थेट मंडळांवरच कारवाई होईल, असा दम दिला होता. गणेश मंडळाच्या ठिकाणी जुगार खेळला तर थेट कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे अनेकांनी यंदा गणेशोत्सवापासून दूर राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे गतवर्षी १९०० पेक्षा जास्त गणेश मंडळे होती. यंदा ही संख्या ८५० पर्यंत खाली आली होती. प्रेमाने घेतलेली वर्गणी योग्य, मात्र जबरदस्तीने मागितल्यास थेट खंडणीचे गुन्हे नोंदवले जातील, अशी तंबी दिल्याने यंदा उत्सवात पडलेले बरे असे अनेकांनी ठरवले होते. त्यामुळे उत्साह दिसला नसल्याचे बोलले जाते.

8 वाजताच विसर्जन
पोलिसांच्या या दणक्यामुळे मानाच्या संस्थान गणपतीची मिरवणूक वेळेत सुरू झाली. या गणपतीच्या विसर्जनासाठी रात्रीचे किमान ११ तरी वाजतात. परंतु यंदा वाजताच विसर्जन झाले. त्यामुळे रात्री १२ वाजता मिरवणुकीच्या रस्त्यावर शुकशुकाट होता.