आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुडगूस: मोकाट जनावरांमुळे आठवडी बाजारातील विक्रेते, ग्राहक हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- मोकाट जनावरांनी वाळूज येथील आठवडी बाजारात धुडगूस घातला आहे. भाजीपाला खाद्यपदार्थांची नासधूस करीत अनेकांवर धावून जात असल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहक हैराण झाले आहेत. त्यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
येथील आठवडी बाजार नगर-औरंगाबाद महामार्गाशेजारील जागेत सोमवारी भरतो. गंगापूर तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून वाळूजच्या आठवडी बाजाराची ओळख आहे. बाजाराच्या लिलावातून ग्रामपंचायतीला वर्षाकाठी लाख ५१ हजार रुपयांचा कर प्राप्त होतो. नगर, औरंगाबाद, नेवासा, श्रीरामपूर, राहुरी, तुर्काबाद खराडी, गंगापूर, पाटोदा, वळदगाव, जालना, कन्नड, सिल्लोड, पैठण, रांजणगाव शेणपंुजी, शेंदुरवादा, वैजापूर आदी भागातून मोठ्या संख्येने व्यापारी माल विक्रीसाठी येतात. अनेक व्यापारी एक दिवस आधी मुक्कामी येतात. सकाळी साडेसहा ते रात्री साडेसातपर्यंत बाजारातील ग्राहकी सुरू असते.
हाकलण्याचाप्रयत्न करताच दिली धडक : गेल्या१० ते १५ वर्षांपासून ग्रामस्थांनी पन्नासच्या आसपास जनावरे मोकाट सोडून दिलेली आहेत. रात्रीच्या वेळी गावालगतच्या शेतमळ्यातील उभी पिके खाऊन ते नुकसान करतात. याचबरोबर आठवडी बाजारात भाजीपाला इतर खाद्यपदार्थाची नासधूस करतात. विक्रेत्यांनी त्यांच्यावर हात उगारला की, ही जनावरे मारण्यासाठी धावून येतात. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांवर जीवघेणा प्रकार ओढवतो.
गंगापूरचे बटाटा विक्रेते महंमद शेख हे या बाजारात मागील ३० वर्षांपासून येतात.४ मे रोजी मोकाट जनावरे त्यांच्या दुकानातील बटाटे खात असताना त्यांनी हाकलण्याचा प्रयत्न केला, असता जनावराने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. बाजारचा लिलाव घेणारे नाजेर हुसेन जहेदी यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवल्याने बिकट प्रसंग टळला. प्रत्येक आठवडी बाजारात मोकाट जनावरांचा धुडगूस सुरू असतो.

कोंडवाड्याचा वापर नाही
मोकाट जनावरांसाठी तत्कालीन सरपंच उदय पाटील चव्हाण यांच्या काळात खाम नदीच्या काठावरील कोंडवाड्याची दुरुस्ती करण्यात आली, परंतु त्याचा उपयोग करण्यात येत नसल्याने मोकाट जनावरांचा उच्छाद वाढला आहे. याला ग्रामपंचायतीचे उदासीन धोरण कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वर्षांपूर्वी महिलेचा अंत
येथीलउमा किशोर धुमाळ या ऑक्टोबर २०१३ रोजी नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरातून दर्शन घेऊन नातलगांसह घरी परतत होत्या. तेव्हा उधळलेल्या मोकाट जनावराच्या धडकेत खाली पडून डोक्याला मार लागल्याने त्यांचा अंत झाला. यासंदर्भात नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारून धारेवर धरले होते. वाळूज पोलिसांनीही ग्रामपंचायतीला पत्र देऊन मोकाट जनावरांवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय ही जनावरे पकडण्यासाठी पोलिस संरक्षण देण्याची तयारीही पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दाखविली होती. मात्र ग्रामपंचायतीने कोणत्याही कार्यवाहीसाठी पुढाकार घेतला नाही. कालांतराने प्रकरणावर पडदा पडला.
जनावरांचा लिलाव करू
-गावात अनेकांनी त्यांची जनावरे मोकाट सोडलेली आहेत. याविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत. या जनावरांसंदर्भात जाहीर प्रगटन काढून त्यांच्यावर चार दिवसांत लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी ही जनावरे ज्यांची असतील त्यांनी ती तातडीने घेऊन जावीत.
-एस.सी. लवाळे, ग्रामविकास अधिकारी, वाळूज
बातम्या आणखी आहेत...