आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To The Possibility Of Getting In Trouble Birds Habitat Jayakwadi Dam Pampahausa

परिणाम तपासा, मगच परवानगी, वन खात्याने तीव्र आक्षेप नोंदवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महत्त्वाकांक्षी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजेच डीएमअायसी प्रकल्पासाठी जायकवाडीहून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीवर आहे. जायकवाडीतून पाणी उपसण्यासाठी सुरू कराव्या लागणाऱ्या पंपहाऊसमुळे सुमारे हेक्टर परिसरातील पक्ष्यांचा अधिवास संकटात येईल. ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषणाचाही धोका असल्याचे वन खात्याने म्हटले आहे. यामुळे उद्योग खात्याने संबंधित एजन्सीला आधी या चाचण्या घ्या, मगच यंत्रणा बसवा, असे निर्देश दिले आहेत. यामुळे जलवाहिनीचे काम काही काळ रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डीएमआयसी प्रकल्पासाठी जायकवाडी बॅकवॉटरमधील ब्रह्मगव्हाण येथून ५७ किलोमीटर अंतराची जलवाहिनी टाकली जाणार आहे. धरणातून पाण्याचा उपसा करण्यासाठी उदंचन विहीर (जॅकवेल), उदंचन गृह (पंपहाऊस) आणि पोहोच पूल (अॅप्रोच ब्रिज) बांधावा लागणार आहे. जायकवाडी हे वन्यजीव अभयारण्य तसेच पक्षी अभयारण्य असल्याने येथे बांधकाम करण्यापूर्वी मुख्य वन संरक्षक, नागपूर यांची परवानगी घ्यावी लागते. एमआयडीसीने अशा परवानगीसाठी अर्ज आणि प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यावर वन खात्याने आक्षेप नाेंदवले आहेत.

१८० प्रकारच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान
जायकवाडीधरण आणि परिसरात १८० प्रकारचे पक्षी आढळतात. यात ५५ स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. पंपहाऊसची यंत्रे लागली तर या पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात येण्याचा धोका आहे. मध्यंतरी जायकवाडीला अति संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून घोषित करण्यावरही बराच वाद झाला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर ते रद्द करण्यात आले.

आधी प्रदूषण तपासा
वनखात्याचे आक्षेप ऐकूण चंद्रा यांनी एमआयडीसीला पंपहाऊसचे कंत्राट देण्यात येणाऱ्या एजन्सीला कोणती यंत्रसामग्री बसवणार, त्यांचा आवाज, कंपने किती असतील याची सविस्तर माहिती मागवली आहे. यंत्र बसवण्यापूर्वी आणि प्रत्यक्ष यंत्र बसवल्यावर प्रदूषणाची पातळी तपासून मगच त्यास परवानगी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

{ पंपहाऊसचे बांधकाम केल्यामुळे जलप्रदूषण होणार आहे का? यामुळे पाण्यातील जीव धोक्यात येतील का?
{ पंपहाऊसच्या आवाजामुळे पाण्याच्या आत आणि पाण्याच्या बाहेर ध्वनी प्रदूषण होईल का?
{ या प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या दैनंदिन जीवनमानावर काही परिणाम होईल का?
{ तसा परिणाम होणार असेल तर एमआयडीसीने त्यावर काय उपाययोजना केली आहे?
पंपांच्यावेळा ठरवू
शुक्रवारीउद्योग खात्याचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी एमआयडीसी, डीएमआयसीच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. यात वन खात्याच्या आक्षेपांवर चर्चा करण्यात आली. पक्ष्यांना त्रास होणार असेल तर सकाळ किंवा संध्याकाळीच पंप सुरू करू, असे डीएमआयसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले, परंतु बैठकीला उपस्थित एका पर्यावरणतज्ज्ञाने यावर आक्षेप घेतला. सकाळ आणि संध्याकाळ हीच पक्ष्यांसाठी महत्त्वाची वेळ असते. या वेळी पंप सुरू करणे अत्यंत चुकीचे आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. असेच आक्षेप निर्माण होत असतील तर डीएमआयसीच्या प्रकल्पाला उशीर होत जाईल, अशी भीती चंद्रा यांनी व्यक्त केली. यावर पर्यावरणतज्ज्ञ म्हणाले की, प्रदूषणाच्या प्रत्येक समस्येवर उपाय आहे. हे उपाय अमलात आणले तर प्रदूषणाचे आक्षेप दूर होतील.
डीएमआयसीच्या जलवाहिनीवर वन खात्याचा आक्षेप, जायकवाडी पंपहाऊसमुळे पक्ष्यांचा अधिवास संकटात येण्याची शक्यता