आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूषित पाणी प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू; पाणीटंचाईमुळे महिलेचा बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिंचोली लिंबाजी- कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील भिलवाडी वस्तीवरील एका ३० वर्षीय महिलेचा दूषित पाणी प्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, १४ रोजी घडली. मंगलाबाई सोनाजी मनगटे असे मृत महिलेचे नाव आहे. पाणीटंचाईमुळे महिलेचा बळी गेल्याची चर्चा आहे.
 
शेलगावअंतर्गत शेलगाव- नाचनवेल रस्त्याला लागून दोन किमी अंतरावर ३० घरे व १७० लोकसंख्या असलेली भिलवाडी वस्ती असून सदरील महिला  पती सोनाजी मनगटे हे  कुटुंबासह या वस्तीलगत स्वतःच्या शेतात (गट नं. २१६) राहत होते. सदरील महिलेच्या सासऱ्याचे पंधरा दिवसांपूर्वी निधन झाले होते. दरम्यानच्या काळात १५ दिवस सतत नातेवाईक व पाहुणेमंडळींची वर्दळ जास्त वाढल्याने मनगटे यांच्या विहिरीचे पाणी कमी होऊन पाणीटंचाई निर्माण झाली होती.  

पिण्याच्या पाण्यासाठी ते त्यांच्या स्वतःच्या शेतातील  विहिरीचे पाणी वापरत  होते. या विहिरीचे पाणी कमी पडल्याने सोनाजी मनगटे यांनी त्यांच्या याच गटातील दुसऱ्या पडक्या  विहिरीचे अनेक महिन्यांपासून साचलेले पाणी आणून घराजवळील विहिरीत सोडले होते. 

मनगटे कुटुंबीयांसह वस्तीवरील १५-२० जणांच्या हे पाणी पिण्यात आल्याने या लोकांना थंडी, ताप, सर्दी, खोकला, उलट्या, अशक्तपणा  असा त्रास होऊ लागला. 

अनेकांनी खासगी दवाखान्यात जाऊन इलाज करून घेतले. परंतु मंगलाबाई यांनी याकडे दुर्लक्ष केले. दुखणे अंगावर काढल्याने  गुरुवारी अचानक त्यांना अशक्तपणा व छातीत दुखू लागल्याने त्यांची प्रकृती  खालावली होती. नातेवाइकांनी त्यांना सिल्लोड येथील खासगी रुग्णालयात हलवले होते. 

मंगलाबाई यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे मंगलाबाई यांचा मृत्यू झाला. 

त्यांच्यावर शुक्रवारी शेलगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. शुक्रवार,  १५  रोजी तहसीलदार विनोद गुंडमवार आणि  गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी मृत मंगलाबाई मनगटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, कन्नड तालुक्यातील शेलगाव येथील भिलवाडी वस्तीवर या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत  असून  वस्तीवर शोककळा पसरली.
बातम्या आणखी आहेत...