आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदरकार वाहतुकीचा औरंगाबादेत तिसरा बळी; नगरसेवक इंगळे यांचा मुलाचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या तीन दिवसांपासून शहरात जीवघेण्या अपघातांची मालिका सुरू आहे. बेदरकार वाहतुकीने आज (रविवारी) नगरसेवक सुरेश इंगळे यांचा मुलगा अश्विन याचा बळी घेतला. रोजाबाग चौकात दूधवाल्याच्या दुचाकीने हुलकावणी दिल्याने अश्विन दुचाकीसह मुरूम भरलेल्या डंपरखाली सापडला आणि त्याचा करुण अंत झाला. गेल्या तीन दिवसांतील हा सलग तिसरा बळी आहे.
शुक्रवारी एसटी महामंडळाची बस आणि दुचाकीत झालेल्या टकरीत वकिलाचा अंत झाला. बीड बायपासवर शनिवारी कार आणि दुचाकीत झालेल्या अपघातात एक मजूर ठार झाला. रविवारी दोन दुचाकींच्या धडकेत नगरसेवक सुरेश इंगळे यांचा मुलगा अश्विन रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या अंगावरून मुरुमाने भरलेला डंपर गेल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. हसरूलहून अण्णाभाऊ साठे चौकाकडे दुचाकीवर जाणार्‍या अश्विन सुरेश इंगळे (21, रा. अशोकनगर, शहाबाजार) या नगरसेवक पुत्राचा डंपरच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. दूध वाहणार्‍या दुचाकीचालकाने हुलकावणी दिल्यामुळे त्याचे नियंत्रण गेले आणि तो मुरुमाने भरलेल्या डंपरखाली सापडला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा अपघात रविवारी सकाळी नऊच्या सुमारास रोजाबाग चौकात घडला. या घटनेमुळे शहाबाजार परिसरात बंद पाळण्यात आला होता.
अपघातांची मालिका:
शुक्रवार-पैठण रोडवरील माँ-बाप दग्र्याजवळ शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या कायनेटिक होंडा आणि महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या अपघातात अँड.शिवराम अहिरे (72, रा. अभिनंदन हाउसिंग सोसायटी, ईटखेडा) यांचा मृत्यू झाला.
शनिवार-दुचाकीवर निघालेल्या अंबड येथील हुसेन मेहताब पठाण (21, रा. डोणगाव) शनिवारी सकाळी बीड बायपास रोडवर दुचाकी आणि स्कोडा कारमध्ये (एमएच 20 सीएच 7933) झालेल्या टकरीत हुसेन पठाण जागीच ठार झाला.
रविवार-अश्विन इंगळेला दूधवाल्या दुचाकीस्वाराने हुलकावणी दिल्याने तो दुचाकीसह मुरुमाने भरलेल्या डंपरखाली सापडला आणि त्याचा घाटीत उपचारादरम्यान अंत झाला.
हात धुतला अन्..
मी जेवण करून हात धूत असतानाच अश्विनच्या मोबाइलवरून मला कॉल आला. मी म्हणालो, बोल बेटा.. तिकडून दुसरीच व्यक्ती बोलली. आपल्या मुलाचा रोजाबाग चौकात अपघात झाला आहे, आपण लवकर या.. हे शब्द ऐकताच मी सुन्न झालो. तातडीने घटनास्थळी गेलो. अश्विन डंपरखाली अडकलेला होता. जॅक लावून त्याला बाहेर काढले. पप्पा.पप्पा म्हणून तो मला मिठी मारत होता. मला चक्कर आली. माझा रक्तदाब वाढला असे सुरेश इंगळे यांनी सांगितले.