आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी जीवनासाठी जपा, फुलवा दुनियादारीतील मैत्रीचे निखळ नाते!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावी.

ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी

आभाळाएवढी ज्यांची उंची

त्यांनी थोडे खाली यावे

मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावरती घ्यावे

या प्रख्यात कवी दत्ता हलसगीकर यांच्या ‘उंची’ या कवितेतील ओळी भावपूर्ण स्वरात सांगत प्रख्यात अभिनेते जितेंद्र जोशी यांनी नात्यांमधील वीण अधिक घट्ट करण्याचा मैत्रीपूर्ण सल्ला तरुणाईला दिला. करारी भूमिकांना साजेसा चेहरा असलेले अभिनेते सुशांत शेलार यांनी स्वत:ला जपा आणि सर्वांवर मनापासून प्रेम करा असे सांगितले, तर तरुणाईचा आवडता नायक अंकुश चौधरीने ‘आयुष्याला सुखी, समाधानी करण्याची ताकद असणारे मैत्रीचे नाते जपा, फुलवा’ असे सांगत गप्पांच्या मैफलीला विलक्षण उंचीवर नेऊन ठेवले.

टीव्ही चॅनल्स आणि यूट्यूबवर धूम उडवत असलेल्या ‘दुनियादारी’ या आगामी मराठी चित्रपटातील हे दिग्गज अभिनेते शनिवारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात आले होते. त्या वेळी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रीकरणातील किस्सेही सांगितले. तासभर रंगलेल्या या मैफलीची अखेर या तीनही अभिनेत्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळा पैलू उलगडत केली. 1970 च्या दशकातील तरुणाईचे भावविश्व सांगणार्‍या ‘दुनियादारी’मधील व्यक्तिरेखा साकारताना सध्याच्या तरुण पिढीने कसे जगावे, कशावर विश्वास ठेवावा याविषयी त्यांनी अतिशय मोलाचे मत मांडले. विनोदी भूमिका साकारण्यात हातखंडा असलेल्या जितेंद्र यांनी हलसगीकर यांच्या कवितांच्या ओळी सादर केल्या तेव्हा त्यांच्या डोळ्याच्या कडाही पाणावल्या होत्या.

सुशांत यांनीही मैत्री हेच सर्वस्व असते. त्यातील ताकद काही औरच आहे. त्यामुळे स्वत:ला जपण्यासोबत सर्वांवर प्रेम करणे शिका, असे सांगितले. अंकुश म्हणाला की, बर्‍याच वेळा आपण मराठी माणसे एकमेकांचे पाय खेचत असतो. म्हणून कुणाचीच प्रगती होत नाही. दुसर्‍या कुणी काही चांगले केले तर त्याचे कौतुक करायला शिकावे. त्याच्या आनंदात आपणही सहभागी झाले पाहिजे.

शेवटी पैसा, प्रसिद्धीपेक्षा दुसर्‍याला आनंद देण्याचे समाधान काही औरच आहे. असे काही तुम्ही करू लागता तेव्हाच रात्री सुखाने झोप लागते. रक्ताची नाती परमेश्वर निर्माण करतो, पण मैत्रीचे नाते आपल्याच हाती असते. आयुष्याला सुखी, समाधानी आणि आनंदी करण्याची ताकद मैत्रीच्या नात्यातच आहे. ते जपा आणि फुलवा.