आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सा. बां.च्या कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासकीय सेवेत दोन वेगवेगळी जातीची प्रमाणपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. जी. पवार आणि उपअभियंता टी. पी. राठोड यांच्यावर मंगळवारी सायंकाळी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आपल्यावर राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा पवार यांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू होताना विद्यमान कार्यकारी अभियंता बी. जी. पवार यांनी बंजारा जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. काही वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी नाईकडा जातीचे प्रमाणपत्र सादर करून उपअभियंता म्हणून पदोन्नती घेतली. काही वर्षे जिल्ह्याबाहेर सेवा बजावल्यानंतर कार्यकारी अभियंता म्हणून ते औरंगाबादेत पदोन्नतीवर आले. ही पदोन्नती घेताना त्यांनी बंजारा जातीचे प्रमाणपत्र सादर केले. .

पवार यांनी वेगवेगळी जातीची प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण औरंगाबाद जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक शेख पाशू शेख यासीन यांनी सहा महिन्यांपूर्वी उघडकीस आणले. पवार यांनी बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शेख यांनी केली होती. सहा महिन्यांपूर्वी तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. पोलिस दुर्लक्ष करीत असल्याने शेख पाशू यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी कार्यकारी अभियंता पवार यांचा जबाब नोंदवून घेतला. अधीक्षक अभियंता यू. के. अहिरे यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

राजकीय दबावातून गुन्हा
४ 2012 मध्ये माझ्याविरुद्ध पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्या वेळी पोलिसांनी तक्रारदाराकडे पुरावे सादर करण्याचे बजावले होते. पुरावे नसल्याने गुन्हा दाखल करता येत नसल्याचे पत्र तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी दिले होते. असे असतानाही अधीक्षक अभियंत्यांवर राजकीय दबाव आणून माझ्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यास भाग पाडून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बी. जी. पवार, कार्यकारी अभियंता, सावर्जनिक बांधकाम विभाग
फसवणुकीचा गुन्हा
शासकीय सेवेत जातीची दोन प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता बी.जी. पवार आणि उपअभियंता टी.पी. राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने चौकशीअंती त्यांना अटक करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
जगन्नाथ कोळेकर, पोलिस निरीक्षक