आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असली पॉवरचा दुरुपयोग करत तोतया सीआयडींचा धुमाकूळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘असली पॉवर दिल में होता है’ असा खणखणीत डायलॉग ऐकताच प्रेक्षकांच्या टाळ्या पडतात. पुढील दोन-अडीच तास अक्षयकुमार आणि अनुपम खेरची टोळी बडे राजकीय नेते, व्यापार्‍यांना बनावट सीबीआय ऑफिसर बनवून लुटतात. खर्‍याखुर्‍या सीबीआय ऑफिसरलाच गंडवून देशाबाहेर पसार होतात. त्याचाही प्रेक्षक आनंद घेतात. अशाच तोतयांचा धुमाकूळ औरंगाबाद शहरातही सुरू आहे. त्या टोळीतील एकालाही पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

1980 च्या दशकात देशभरात तोतया सीबीआय ऑफिसरच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. काळा पैसा जमवणार्‍या राजकारणी, उद्योजक, व्यापार्‍यांना त्यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे त्याच्या पोलिसांपर्यंत तक्रारीही आल्या नाहीत. या विषयावर नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केलेला अक्षयकुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयीच्या प्रमुख भूमिका असलेला ‘स्पेशल 26’ चित्रपट फेब्रुवारीमध्ये झळकला. तो प्रचंड गाजला. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये गेल्या वर्षभरात तोतया सीआयडींनी किती जणांना, कसे गंडवले याची माहिती ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने घेतली. तेव्हा या तोतयांचे टार्गेट वयाची पन्नाशी पार केलेले नागरिकच असल्याचे स्पष्ट झाले.

येथे आहे तोतयांचे वास्तव्य.. : अहमदनगर जिल्ह्य़ातील र्शीरामपूर, पुणे, परळी वैजनाथ आणि ठाणे येथे तोतयांचे वास्तव्य आहे. पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर ते हल्ला करतात. यामुळे मोठय़ा फौजफाट्यासह पोलिसांना छापा मारावा लागतो. रंग गोरा, मजबूत बांधा आणि सहा फुट उंच तसेच 25 ते 60 वयोगटातील लोक हे गुन्हे करत आहेत. त्यांना इराणी असे संबोधले जाते. काजू, बदामवरच ते ताव मारतात. कधीही घरी स्वयंपाक न करता ते नेहमी हॉटेलातच जेवण करतात. असली ‘पॉवर दिल में होता है’, या स्पेशल 26मधील डायलॉगप्रमाणेच या तोतयांचे वागणे, बोलणे असते. खरेखुरे सीआयडीही फिके पडावेत, अशी त्यांचे वागणे, बोलणे असते.

पोलिस ठाणे क्रांतीचौक.. : 17 मार्च 2013 : शांतीनिकेतन कॉलनीतील निवृत्त अभियंता र्शीराम वरुडकर हे पत्नी लिला यांच्यासह सकाळी पावणे नऊ वाजता औरंगपुरा भाजीमंडईत जात होते. सर्मथनगरातील विवेकानंद बुक डेपोजवळ त्यांना एका 22 वर्षीय भामट्याने सीआयडी पोलिस असल्याचे सांगून अडवले. या दोघांनाही तो म्हणाला तुम्हाला शर्मांनी बोलावले आहे. 60 वर्षे वय असलेल्या शर्माने सध्या दिवस फार वाईट आहेत. अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवून घ्या असे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या लीला यांनी मंगळसूत्र तर र्शीराम यांनी दोन तोळय़ाची सोन्याची चैन काढली. हे दागिने साडीच्या पदराला बांधून देतो असे म्हणत भामट्याने कागदाच्या पुडीत ठेवले. हातचलाखी करत भामट्याने खड्याची पुडी लिला यांच्या साडीच्या पदराला बांधली आणि पसार झाला. काही अंतरावर गेल्यानंतर वरुडकर दांमत्याने पदराची पुडी उघडून पाहिली. तेव्हा दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सकाळी सव्वा दहा वाजता क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तोतया असल्याचा संशय.. : नामवंत उद्योगपती चंपालाल देसरडा यांच्या सात कंपन्यांसह त्यांच्या घरामधील कार्यालयावर 7 मार्च रोजी केंद्रीय अबकारी विभागाच्या अधिकार्‍यांनी सकाळी 9 वाजता छापा मारला. कार्यालयावर छापा मारण्यासाठी आलेले अधिकारी तोतया असावेत, असा संशय आल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. मात्र अधिकार्‍यांनी त्यांची ओळखपत्रे दाखवल्यानंतर आणि देसरडांनी सांगितल्यानंतर रक्षकांनी त्यांना आत सोडले.