आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शॉर्टकट’ अंगलट: औरंगाबादेत बनावट नोटांच्या कारखान्याचे फुटले बिंग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एम.ए. बी.एड.पर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरी न मिळाल्याने राहुल रामकिसन खरतडेने (26) पैसे कमावण्याचा अफलातून ‘शॉर्टकट’ शोधला. त्याने घरातच बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला आणि कित्येक नोटा त्याने हातोहात खपवल्यासुद्धा. परंतु अखेर त्याच्या काळय़ा कारनाम्याचे बिंग फुटले आणि तो सोमवारी (1 जुलै) पोलिसांच्या जाळय़ात अडकला.

राहुलने छापलेल्या नोटा संपूर्ण औरंगाबाद जिल्हाभर आणि नगरमध्ये खपवल्याचा संशय पोलिसांनीच व्यक्त केला आहे. त्याच्याकडून एक हजाराच्या नऊ तर पाचशे रुपयांच्या दोन अशा एकूण दहा हजारांच्या 11 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणार्‍या भोंदूबाबांना राहुलने बनावट नोटा पुरवल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. त्याची बहीण जवाहरनगर पोलिस ठाण्यात शिपाई आहे. बहीण पोलिसात असल्याने आपणावर कोणीही हात टाकणार नाही, असा विश्वास असल्याने त्याने कैलासनगरमधील राहत्या घरात बिनदिक्कतपणे बनावट नोटांचा कारखाना थाटला होता. दोन वर्षांपूर्वी तो स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय करत होता. यात कमी पैसे मिळत असल्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचा मार्ग अवलंबला. सहा महिन्यांपासून तो हा उद्योग करत असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सोमवारी रात्री या कारखान्यावर छापा मारून राहुलला ताब्यात घेतले. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पाच जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

राहुल खरतडेची बहीण जवाहरनगर ठाण्यात पोलिस शिपाई

दोन वर्षांत झाला श्रीमंत
राहुलकडे साधी सायकलही नव्हती. परंतु दोन वर्षांत त्याने दोन दुचाकी आणि एक इंडिका कार विकत घेतली. चार ते पाच महिन्यांपासून नोटांच्या छपाईचे काम घरातच सुरू असल्याचे त्याने पोलिस तपासात सांगितले आहे. परंतु दीड वर्षापासून तो नोटांची छपाई करत असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खबर्‍यामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, जमादार राजेंद्रसिंग राजपूत, दत्ता ढंगारे, शेख नवाब, विशाल सोनवणे, सुनील काळे आणि प्रदीप शिंदे यांनी राहुलला अटक केली. राहुलच्या आईचे निधन झालेले आहे. तर वडील शासकीय नोकरीतून निवृत्त झालेले आहेत. त्याला पाच मोठय़ा बहिणी असून, त्यांना तो एकुलता एक भाऊ आहे.

नगरमध्ये हातोहात खपवल्या नोटा
बनावट नोटा राहुलने नगरमधील दोघांना विकल्या. त्याने बनावट नोटा कोणाला विकल्या याचा शोध घेण्यासाठी जिन्सी पोलिसांचे पथक रात्रीच नगरकडे रवाना झाल्याचे पोलिस निरीक्षक गफूर पाटील यांनी सांगितले. मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता असून, एखादा भोंदूबाबाही त्यांचा साथीदार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

खर्‍या नोटेची 24 वैशिष्ट्ये आत्मसात
बनावट नोट अस्सल वाटावी यासाठी राहुलने आधी खर्‍या नोटेवरील 24 वैशिष्ट्यांची माहिती मिळवली. हुबेहूब नोट छापण्यासाठी त्याने पंधरा दिवस शेकडो कागद खर्ची घातले. नोटेचा रंग व त्यावर असलेली हिरवी पट्टी आणण्यासाठी त्याने ‘एक्झिक्युटिव्ह बाँड’ चे कागद आणून ते नोटेच्या आकारात तंतोतंत कापले. एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा स्कॅन करून कलर प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटांची छपाई तो करत असे. त्यानंतर बनावट नोटांची छपाई करून त्या नोटा चलनात आणण्यात यश मिळवले.

एकाला झाली होती दीड वर्ष शिक्षा
बनावट नोटांच्या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी शहरात तीन जणांना अटक केली. या गुन्ह्यात जामिनाची तरतूद नसून, मुख्तार हुसेन याला 18 मार्च 2013 रोजी न्यायालयाने दीड वर्ष सक्तमजुरी, दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सध्या बनावट नोट प्रकरणातील तीन आरोपी हसरूल कारागृहात असून, दोघांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या तिन्ही प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेचे सहायक फौजदार हरीश खटावकर यांनी केला.

शहरातील दुसरी घटना
2004 मध्ये चार तरुण सर्मथनगरात संगणकावर शंभर रुपयांच्या बनावट नोटा तयार करत होते. पोलिसांनी 20 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

पाकिस्तानातून शहरात
पाकिस्तानातून दुबईमार्गे औरंगाबादेत (2003 मध्ये ) ब्ल्यू डार्ट कुरियरमार्फत शहरात बनावट नोटा येत होत्या. गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक डॉ. कांचन चाटे यांनी पडेगावात छापा मारून अडीच लाख रुपयांच्या पाचशेच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. जेरबंद केलेल्या टोळीने 40 लाख रुपयांच्या बनावट नोटा बाजारपेठेत खपवल्या.

बनावट नोटांच्या दीड वर्षापूर्वीच्या तीन घटना
29 सप्टेंबर 2011
सिडको कॅनॉटमधील शुभम मोबाइल शॉपी चालकाला एक हजार रुपयांची बनावट नोट देऊन त्याच्याकडून नूर इस्लाम सादिक अली (रा. रोही तालाब, झारखंड) मोबाइल रिचार्ज व्हाऊचर खरेदी करत होता. बनावट नोट असल्याचा संशय आल्यानंतर शॉपीमालकाने सिडको पोलिसांशी संपर्क साधला होता. या वेळी अलीकडून 33 बनावट नोटा जप्त केल्या होत्या.

23 ऑक्टोबर 2011
कुंभारवाडा परिसरात साहित्य खरेदी केल्यानंतर सुटे पैसे आणण्यासाठी जात असताना तेथील व्यापार्‍यांनी बनावट नोटांसह फिरणार्‍या शेख नजीर शेख फैलू (रा. साहेबगंज, झारखंड) याला पकडले होते. यानंतर त्याची माहिती सिटी चौक पोलिसांना दिली होती. या वेळी शेख नजीरकडून एक हजाराच्या तीन नोटा हस्तगत करण्यात आल्या होत्या.

24 ऑक्टोबर 2011
एन-11 परिसरातील सुभाषचंद्र बोसनगरातील श्रीकृष्ण तेल भांडारजवळ मुख्तार हुसेन बिसू शेख (रा. जोधपूर, पश्चिम बंगाल) हा सागर विशाल खरगे याला एक हजाराची बनावट नोट देऊन भांडी खरेदी करत होता. या वेळी सागरने माहिती दिल्यानंतर सिडको पोलिसांनी मुख्तार हुसेनला पकडले होते. त्याच्याकडून चार बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.