आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात धुळीचे वादळ; वेग ताशी 8 किमी, पाराही 12. 8 अंशावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात आज (17 जानेवारी) दुपारी 12 वाजता अचानक धुळीचे वादळ आले. कुणाला काही कळायच्या आत धुळीचे वेगवान लोट रस्त्यावरून वाहू लागल्याने दुचाकी, चारचाकी आणि जड वाहनांना अचानक रस्त्यावर थांबावे लागले. अशी स्थिती सेव्हन हिल्स चौक, निराला बाजार, रेल्वेस्टेशन परिसर, शहागंज परिसर, गुलमंडी, टीव्ही सेंटर आदी भागांत होती. या वादळाचा वेग आज ताशी तीन-चार किमींनी अधिक होता. एरवी तो ताशी चार-पाच किमी असतो.

बदलत्या ऋतुचक्राच्या प्रतिकूल परिणामामुळे पश्चिम आणि पूर्वेकडून वार्‍यांचा प्रवाह वेगाने आपल्याकडे दाखल होत आहे. गत तीन दिवसांपासून आकाशात ढगही जमा होत आहेत. त्याचाच हा परिणाम असल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे. शहरात आलेल्या वादळामुळे निराला बाजारातील एका दुकानाचे होर्डिंग कोसळले. वेगवान हवेमुळे उंच झाडे जोरजोराने हलू लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. गेल्या आठ दिवसांपासून शहराच्या तापमानात चढ-उतार होताना दिसून येत आहे. दुपारच्या तापमानात वाढ होत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. पुढे तापमानात वाढ होत जाणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

उत्तर भारतात बर्फवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण उत्तर भारत गारठला आहे. याचबरोबर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश राज्यांत बोचर्‍या थंडीने कहर केला आहे. मकरसंक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे. पश्चिम आणि पूर्वेकडून वारे वेगाने वाहत आहेत. यामुळे तापमानात चढ-उतार होत आहे. पुढेही दिवसेंदिवस तापमानात वाढ होत जाणार असल्याचा अंदाज आहे.

शहरवासीयांची काही काळ तारांबळ
मागील पाच दिवसांत कमाल आणि किमान तापमानात दोन ते चार अंशांनी चढ-उतार दिसून आला. दुपारी उकाड्यात वाढ होत आहे. बाष्पीभवन वेगाने होत असल्याने जलसाठय़ातील पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. आज दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत वारे वेगाने वाहत होते. हे वारे धुळीचे लोट आकाशात घेऊन वाहत असल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली होती. चालकांना वाहने चालवताना अडथळा निर्माण होत होता. धुळीच्या वादळामुळे अनेकांना आज हेल्मेटचे महत्त्व पटले.

वार्‍याचा वेग आठ किमी
गत तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. यामुळे बहुतांश भागांत ढगाळ वातावरण दिसून आले. सूर्याचे उत्तरायण सुरू झाले आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस तापमानात वाढ होत जाणार आहे. या दिवसांमध्ये वारे वाहत असतात. आजच्या वार्‍याचा वेग ताशी सात ते आठ किलोमीटर असावा. डॉ. रामचंद्र साबळे, हवामानतज्ज्ञ.

वारे फिरले
संक्रांतीनंतर आपल्याकडे पश्चिमी वारे वाहतात. ते आता आपल्या भागाकडे फिरले आहेत. धुके पडणे कमी झाले आहे. यामुळे तापमानात वाढ होत आहे. र्शीनिवास औंधकर, एमजीएम खगोलशास्त्र केंद्र, नांदेड