आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dwarkadas Bhang Known With As Studious Person In Police Forces From 24 Years

साधा हवालदार; पण पुस्तके आयुक्तांसाठीही मार्गदर्शक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या २४ वर्षांपासून पोलिस दलातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले द्वारकादास भांगे हे साधे हवालदार असले तरी पोलिस निरीक्षक असो की आयुक्त यांना ते कायम हवेहवेसे वाटतात. कारण केवळ भारतीय दंड संहिता नव्हे तर कायद्याचा अभ्यास, विविध न्यायालयांच्या वेगवेगळ्या निकालांचे वाचन, तपास करण्याच्या पद्धतींचा अभ्यास, तपासी अंमलदारांना मार्गदर्शन आणि कायम मदतीला धावून जाण्याचा स्वभाव ही त्यामागील कारणे आहेत.
नुकतेच त्यांच्या ‘सुप्रीम कोर्ट ऑन रेप केसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलिस महासंचालक संजीव दयाल यांच्या हस्ते झाले. यापूर्वी २०११ मध्ये त्यांनी ‘डाइंग डिक्लेरेशन’ हे पोलिसांच्या तपासासाठी मार्गदर्शक असे पुस्तक लिहिले होते. आताही ते नव्या अभ्यासात व्यग्र असून पुढील वर्षी आणखी पुस्तक पोलिस सहकाऱ्यांसाठी निघू शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

भांगे हे शासकीय महाविद्यालयातून बीएस्सी झाले. त्यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. नंतर मात्र पोलिस दलात रुजू झाले. इंग्रजीवर प्रभुत्व असल्यामुळे ते न्यायालयाचे निवाडे कायम वाचत. त्यातच त्यांना वाचण्याची ओढ. त्यामुळे कायद्याचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांची बहुतांश नोकरी ही आयुक्तालयातील ‘लीगल’च्याच टेबलवर गेली. तपासी अंमलदार तसेच अन्य अधिकाऱ्यांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शनही केले. पूर्वीच्या टाडा कायद्याचाही त्यांनी अभ्यास केला होता. गुन्हेगारांना स्थानबद्ध तसेच तडीपार करण्यापूर्वीची तयारीही भांगे करतात. त्यामुळेच त्यांनी किचकट कायद्याची माहिती सोप्या शब्दांत या पुस्तकांत मांडली आहे.
अशी झाली पुस्तकांची सुरुवात
डाइंग डिक्लेरेशन अर्थात मृत्युपूर्व जबाब या विषयावर मार्गदर्शक अशी माहिती सर्व तपासी अधिकाऱ्यांना असावी म्हणून त्यावर काहीतरी लिहा, असे तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी भांगे यांना सांगितले. भांगे यांचा अभ्यास होताच. लगेच त्यांनी काम हाती घेतले अन् अवघ्या काही दिवसांत ते पूर्णही झाले. जिल्हा न्यायाधीश संगीत राव यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन झाले होते. त्यानंतर बलात्काराच्या प्रकरणात कसा तपास केला म्हणजे आरोपी सुटणार नाही, याची माहिती असावी म्हणून त्यांनी "सुप्रीम कोर्ट ऑन रेप केसेेस' हे पुस्तक लिहिले. बलात्काराच्या वेगवेगळ्या प्रकरणांत सुप्रीम कोर्ट काय म्हणाले, त्यांनी पोलिसांना काय सूचना केल्या, कोणत्या परिस्थितीत कोणते पुरावे ग्राह्य धरले जातात, कोणते पुरावे सोडले जातात, याची माहिती या पुस्तकात आहे.
तपासी अधिकाऱ्यांना मदत
- चुकीच्या आरोपीला शिक्षा होऊ नये तसेच खरा आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटू नये, असे कायदा म्हणतो. न्यायालय वेळोवेळी काही मार्गदर्शक सूचना करते. याची माहिती तपासी अधिकाऱ्याला असावी, या भावनेने मी दोन्ही पुस्तके लिहिली. त्यासाठी मला तत्कालीन आयुक्त संजयकुमार यांनी प्रेरित केले. "सुप्रीम कोर्ट ऑन रेप केसेस' या १२१ पानी पुस्तकात वेगवेगळी २२ प्रकरणे आहेत. प्रत्येक तपासी अधिकाऱ्याला याची मदत नक्कीच होईल.
- द्वारकादास भांगे, हवालदारतथा दोन पुस्तकांचे लेखक