आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉकिंग पॉइंट: नेत्यांच्या मुलांनी का लढू नये?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेत्यांच्या मुलांनी निवडणूक लढवली तर कार्यकर्त्याच्या हक्कावर गदा येते आणि म्हणून नेत्यांच्या नातलगांनी निवडणूक लढू नये, असे उत्तर कार्यकर्ते देतात; पण सर्वसामान्य मतदारांचीही तशी भावना का असते? 'घराणेशाही' या शब्दाचा राजकारण्यांनी राजकारणासाठी करून घेतलेला उपयोग, खरे तर दुरुपयोगच त्या भावनेच्या मुळाशी असतो, असे लक्षात येते. म्हणजे कसे? उदाहरणार्थ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकेकाळी कॉंग्रेसच्या कथित घराणेशाहीवर कडाडून हल्लाबोल चालवला होता. बाळासाहेबांचे वक्तृत्व भारावून टाकणारे आणि मनावर पक्के बिंबणारे होते. त्यामुळे राजकारणातील मंडळींनी आपल्या पुढच्या पिढ्यांना राजकारणात आणणे ही वाईटच गोष्ट आहे, असे सर्वसामान्य मतदारांचे ठाम मत बनले आहे. वास्तविक, राजकारणात घराणेशाही अस्तित्वातच असू शकत नाही. जर ती अस्तित्वात असेल तर त्याला संबंधित नेते नव्हे, मतदारच जबाबदार असू शकतात. मतदारांनी ठरवले तरच कोणत्याही नेत्याच्या नातलगांचा निवडणुकीत विजय होऊ शकतो. अन्यथा, इंदिरा गांधींनाही मतदारांनी पराभूत केल्याचा इतिहास आहेच. एवढेच कशाला, नुकताच दिल्लीत एकप्रकारे नरेंद्र मोदी यांचाही पराभवच झाला आहे. इतकी ताकद जर मतदारांमध्ये असेल आणि ते शक्तीमान समजल्या जाणा-या नेत्यांचाही पराभव करू शकत असतील तर नेत्यांचे नातलग ही काय चीज आहे? एखाद्या नेत्याचा नातलग, अपत्त्य आहे म्हणून निवडणूक लढवायला विरोध करणेही लोकशाहीच्या तत्वात बसणारे नाही. अनेक नेत्यांची पुढची पिढी त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावी सिद्ध झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत आणि दिग्गज उमेदवारासमोर एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला मतदारांनी निवडून दिल्याचीही असंख्य उदाहरणे आहेत. अर्थात, एखाद्या प्रामाणिक आणि लायक कार्यकर्त्याला डावलून नेत्याच्या मुलाला उमेदवारी दिली गेली असेल तर त्या कार्यकर्त्याने काय करायचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून विचारला जाण्याची शक्यता आहे. राजकारणाची गमक तिथेच तर आहे. अशा कार्यकर्त्याने काय करायचे, हे आपण उद्याच्या अंकात पाहू.