आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dynastic Politics In Aurangabad Municipal Corporation Elections

टॉकिंग पॉइंट: नेत्यांच्या मुलांनी का लढू नये?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेत्यांच्या मुलांनी निवडणूक लढवायचीच नाही का? असा प्रश्न औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी नुकताच पत्रकारांना विचारल्याचे वृत्त बहुतेकांनी वाचलेच असेल. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि फोटो पाहून खैरे यांचा प्रश्न आणखी व्यापक करीत नेत्यांच्या नातलगांनी (बायको, सून, मुलगी, पुतण्या, जावई, भाऊ, बहीण, आई इ.) निवडणूक लढवायचीच नाही का? अशा स्वरूपात एकत्रितरीत्या औरंगाबादकरांना विचारला जातो आहे, अशी कल्पना करायला हरकत नाही. संबंधित नेत्यांनी खरंच एका माइकसमोर उभे राहून एका सुरात हा प्रश्न विचारला, तर औरंगाबादकरांचे काय उत्तर असेल? बहुतेक मतदार उत्साहाच्या भरात ‘नाही’ असे म्हणतील, अशीच शक्यता जास्त आहे. तळमळीने पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते तर उच्चरवाने नाही म्हणतील, यात शंका नाही.
काही वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला गेला असता तर शिवसेनेचे नेतेही नाही म्हणणा-यांमध्ये अग्रभागी असते आणि त्या विषयावर भाषण करीत त्यांनी काँग्रेसमधल्या गांधी घराण्यावर टीका करण्याची संधीही या निमित्ताने आवर्जून घेतली असती. आज तेच हा प्रश्न विचारताहेत. काळाचा महिमा. दुसरं काय?

औरंगाबादकरांचे उत्तर भलेही ‘नाही’ असे असेल; पण ते भावनेच्या भरात दिलेले असेल. खरं तर आपण निवडणुकाच भावनेच्या भरात हाताळतो, हे आपलं (म्हणजे भारतीयांचं) वैशिष्ट्य आहे. कधी कोणी मरण पावले म्हणून आपण सद्गदित होऊन मतदान करतो, तर कधी धर्मसंकटात सापडलेले असतो आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर येऊन पडते म्हणून आपण विशिष्ट पक्षाला आणि उमेदवाराला मतदान करतो. खासदार खैरेंच्या प्रश्नाचे उत्तरही असेच भावनेच्या भरात अनेक औरंगाबादकरांनी मनातल्या मनात कधीच देऊन टाकलं असेल. निवडणुकीत मतदाराची शक्ती, त्याच्या विवेकबुद्धीवर व्यवस्था निर्माण करणा-यांनी ठेवलेला विश्वास, परिवर्तनाचे चांगले-वाईट परिणाम, महापालिकेची गरज, उमेदवाराची क्षमता, चारित्र्य, भूमिका यांचा विचार किती मतदार करतात? तो करायला हवा, याची जाणीव तरी किती मतदारांना असते? मतदान करताना काय विचार करायला हवा, याचे तरी भान आपण किती बाळगतो? असो. विषय नेत्यांच्या नातलगांचा आहे. त्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधूया. नेत्यांच्या मुलांनी निवडणूक का लढवायची नाही, या प्रश्नाचे उत्तर आपण काय देऊ? मुळात असा प्रश्नच उपस्थित होत नाही. कोणालाही, जो भारताचा नागरिक आहे आणि वेडा किंवा गुन्हेगार नाही आणि २१ वर्षे किंवा अधिक वयाचा आहे त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार घटनेनेच दिला आहे. या देशात जर अरूण गवळीसारखे गूंड निवडणूक लढवू शकतात तर नेत्यांच्या नातलगांनी काय पाप केलं आहे? ते नेत्यांच्या पोटी जन्माला आले हा त्यांचा गुन्हा आहे का? जर तो गुन्हा नसेल तर त्यांना निवडणूक लढवण्यापासून कोण रोखू शकणार? अर्थात, कोणीही नाही. तरीही बहुतांश मतदार ‘नाही’ असे उत्तर देण्याच्या मानसिकतेत का असतात, याचा विचार केला पाहिजे. नेत्यांच्या मुलांच्या उमेदवारीमुळे आपल्यावर, आपण केलेल्या कामावर अन्याय होतो, अशी कार्यकर्त्यांची भावना असते. त्या भावनेतून कार्यकर्ता या प्रश्नाकडे पाहातो. कार्यकर्त्याचे नुकसान होत असल्यामुळे त्याचा विरोध समजू शकतो; पण मतदारांचे उत्तर नकारात्मक का असते? पाहू या उद्याच्या अंकात.