आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुलभ न्यायदानासाठी ई-फायलिंग; मुख्य न्यायमूर्ती शहा यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सुलभ न्यायदानासाठी मुंबई उच्च न्यायालयात प्रायोगिक तत्त्वावर ई-फायलिंगचा प्रयोग सुरू झाला आहे. नागपूर, औरंगाबाद व गोवा खंडपीठातही एक सप्टेंबरपासून हा उपक्रम राबवला जाणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी सांगितले.

खंडपीठ स्थापनेस 32 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वकील संघाच्या वतीने मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी, तर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष अँड. सतीश तळेकर, सचिव अँड. अमोल सावंत, उपाध्यक्ष व्ही. पी. गोलेवार, मधुबाला गंगवाल आदींची उपस्थिती होती. शहा म्हणाले, जिल्हा न्यायालयात सुनावणीप्रसंगी साक्षीदारांचा शोध घेण्यात खूप वेळ वाया जातो. सिंगापूरला साक्षीदारांसह खटल्याशी निगडित व्यक्तींना स्मार्ट कार्ड दिले जातात. न्यायालयीन परिसरात प्रवेश करताच स्मार्ट कार्ड स्वॉप केल्याने कुठले साक्षीदार हजर आहेत हे डिजिटल बोर्डावर दिसते व त्यानुसार न्यायाधीशांना पुढील कार्यवाही करता येते. अशी प्रणाली भारतामध्ये अवलंबण्यासंबंधी हालचाली सुरू आहेत. भविष्यात पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे युक्तिवाद केला जाणार असल्याचे न्या. शहा यांनी सांगितले. न्यायालयीन कामकाजात वीज भारनियमनाचा व्यत्यय येऊ नये यासाठी एक्स्प्रेस लाइन टाकण्यासंबंधीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादेत खंडपीठाची स्थापना झाल्यामुळे मराठवाड्यातील मागास पक्षकारांना जलदगतीने न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याचे ते म्हणाले.
खंडपीठ स्थापनेवेळी याचिकांची संख्या तीन हजार होती. ती आता एक लाख 14 हजार 514 वर गेली आहे. खंडपीठाच्या स्थापनेत माजी मुख्य न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांडे व माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे मोठे योगदान असून, जीवनाच्या सर्व भागात प्रगत तंत्रज्ञानाच्या वापर होत असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्तींनी वकिलांचा आदर केल्यास समाजात न्यायमूर्तींचा आदर, सन्मान वाढेल, असे न्या. चंद्रचूड म्हणाले. औरंगाबाद खंडपीठात अँड. एस. पी. कुडरुकर यांनी तरुण वकिलांना तयार केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास न्या. रवींद्र बोर्डे, न्या. एस. एस. शिंदे, न्या. के. यू. चांदीवाल, न्या. के. के. तातेड, न्या. मृदुला भाटकर, न्या. टी. व्ही. नलवडे, न्या. ठिपसे, न्या. एआयएस चिमा, न्या. सुनील देशमुख, न्या. रवींद्र घुगे, न्या. एम. टी. जोशी यांची उपस्थिती होती. अँड. चैतन्य धारूरकर यांनी सूत्रसंचालन केले. अँड. अमोल सावंत यांनी आभार मानले.