आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • E Learning Coerce In Corporation School Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपाच्या प्रियदर्शिनी इंदिरानगर माध्यमिक शाळेत ई-लर्निंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोय नाही म्हणत यंत्रणेला दोष न देता आहे त्या परिस्थितीत काही हटके करून दाखवणे हे कठीण काम. प्रियदर्शिनी इंदिरानगर या मनपाच्या माध्यमिक शाळेने ते करून दाखवले. शहरातील काही खासगी शाळांमध्ये ई-लर्निंग सुरू झाले. मग आपली मुलेही मागे राहायला नकोत, असा विचार करून पालिकेच्या या शाळेनेही अध्यापनाची ही आधुनिक पद्धत सुरू केली. इथले सहशिक्षक शशिकांत उबाळे यांच्या कल्पक बुद्धीतून ही कल्पना पुढे आली. मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी त्यास पाठिंबा दिला आणि हा उपक्रम पूर्णत्वास गेला. विशेष म्हणजे यासाठी लागणारा व्हिडिओ, अँनिमेशन, व्हॉइस ओव्हर आणि जिंगल्स उबाळे यांनी उन्हाळ्याची अख्खी सुटी खर्च करून तयार केल्या. प्रोजेक्टर प्रायोजक आणि शिक्षकांनी वर्गणी जमवून विकत आणला आणि ही शाळा खर्‍या अर्थाने आधुनिक झाली.

विद्यार्थ्यांच्या मनातून अभ्यासाची भीती जावी, पुस्तकातील किचकट बाबी सहज, सोप्या आणि करमणुकीच्या माध्यमातून समजाव्यात यासाठी आता ही मनपाची प्रियदर्शिनी इंदिरानगर माध्यमिक शाळा सज्ज झाली आहे. शाळेने काळासोबत पावले टाकत आपल्या विद्यार्थ्यांसाठी खास ई-लर्निंग पद्धत सुरू केली आहे. मोठय़ा स्क्रीनवर इंग्रजीतील अवघड कविता शिकताना मुले हरवून जातात.
उपलब्ध साधनांचा वापर
उबाळे गेल्या वर्षी पाचवीच्या वर्गाचे वर्गशिक्षक होते. ते शाळेत इंग्रजी शिकवतात. यामुळे त्यांनी या वर्गातील इंग्रजीच्या पुस्तकातल्या कवितांचे ई-लेसन तयार करण्यास सुरुवात केली. शाळेकडे काही कवितांचे ऑडिओ ट्रॅक उपलब्ध होते. त्यांचा बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापर केला, तर कवितांना अनुरूप चित्रांसाठी पाठय़पुस्तकांची मदत झाली. कवितेसाठी लागणारी चित्रे वेगवेगळ्या पाठय़पुस्तकांतून गोळा केली. त्यांना स्कॅन करून फोटोशॉपमध्ये त्यावर संस्कार केले. शाळेचा परिसर, वर्ग आदींची छायाचित्रे काढून त्यांचा वापर केला. इंटरनेटवर वाटेल तेवढी चित्रे मिळाली असती, पण पुस्तकातील चित्रांमुळे मुलांना जवळीक वाटते, असे उबाळे यांचे मत आहे. यासाठी लागणारे निवेदन, व्हॉइस ओव्हरही शिक्षकांनीच केले आहे. उन्हाळ्याची सुटी संपेपर्यंत पाचवी आणि सहावीतील कविता आणि धड्यांचे ई-पाठ तयार झाले. आता त्यांनी सातवीच्या अभ्यासक्रमाचे ई-धडे तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
- शिक्षणाच्या आधुनिक प्रवाहापासून मुळे वंचित राहू नये यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केला आहे. पुस्तकातील पाठ पडद्यावर दिसू लागल्यामुळे विद्यार्थी मनापासून शिकतात. अभ्यास समजण्यास सोपा जातो. संजीव सोनार, मुख्याध्यापक
- सध्या पाचवी ते सातवीचे ई-पाठ तयार केले आहेत. शाळेचे नियमित शेड्यूल सांभाळून हे काम केले. यास मुलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. त्यांची भीती दूर झाली आहे. यामुळे इतर सर्वच वर्गांतील अभ्यासासाठी ई-पाठ तयार करणार आहोत. -शशिकांत उबाळे, सहशिक्षक
वर्गणीतून प्रोजेक्टर
गेल्या वर्षी या शाळेने संगणकाची अद्ययावत लॅब सुरू केली आहे. या संगणकावर हे पाठ बघता आले असते, पण त्यातून आनंद मिळाला नसता. यामुळे शाळेने प्रोजेक्टर घेण्याचा विचार केला. त्यासाठी भाजप नेते आणि उद्योजक अतुल सावे यांनी मदत केली, तर उर्वरित रक्कम शिक्षकांनी वर्गणीतून गोळा केली. संगणकात फोल्डरमध्ये इयत्तेप्रमाणे हे पाठ सेव्ह करण्यात आले आहेत. शाळेच्या नियमित वेळापत्रकानुसार शिक्षक मुलांना हे पाठ दाखवतात.
दोन महिन्यांत ई-लेसन्स
बीए, डीएड असणारे शशिकांत उबाळे घरी लग्नाची व्हीसीडी बघत होते. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला गाणे सुरू होते. अभ्यासक्रमातील कविता, धड्यांनाही गाणे, जिंगल्सची साथ दिली तर.. कल्पना मनात आली आणि ते कामाला लागले. मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्याकडे ही कल्पना मांडली. सोनार यांना फोटोशॉप, कोरलड्रॉ, साऊंड फोर्ज आणि अँनिमेशनविषयीची माहिती होती. याचा वापर करून त्यांनी या प्रकल्पावर काम सुरू केले.