आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीला कंटाळून नववीतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
file Photo - Divya Marathi
file Photo
औरंगाबाद : समीर मणियार या विकृत तरुणाच्या त्रासाला कंटाळून श्रुती कुलकर्णी या युवतीने आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादकरांच्या स्मरणात कायम असतानाच सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या छेडछाडीला कंटाळून इयत्ता नववीतील मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे.
 
क्रांती चौक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका शाळेत ही मुलगी शिकते. टवाळखोर मुले मुलींना त्रास देत असल्याच्या तक्रारी यापूर्वी शाळेच्या प्रशासनाने पोलिसांकडे केल्या होत्या. मात्र, त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळाल्यावर अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती मिळताच तो फरारही झाला आहे. 
 
समता नगरातील एका शाळेत शिकणाऱ्या संगीताची (नाव बदलले आहे) रोज दुपारी साडेबारा ते पाच या वेळेत शाळा असते. बुधवारी दुपारी तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. सव्वाबाराच्या सुमारास तिने दोरीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
 
सुदैवाने तिची आई अचाकनपणे घरी परत आली. तिला हा धक्कादायक प्रकार दिसला. तिने आरडाओरड करताच शेजारचे काहीजण धावत आले. त्यांनी दरवाजा उघडत संगीताला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने संगीताचा जीव वाचला. 

तो मला खूप त्रास देतो : आई आणि शेजारच्या लोकांनी वारंवार विचारणा केल्यावर संगीताच्या संयमाचा बांध सुटला. धाय मोकलून रडत तिने एक मुलगा मला गेल्या सहा महिन्यांपासून छेड काढतो. अश्लील बोलून खूप त्रास देतो. त्याला कंटाळून मी अखेर आयुष्याचा शेवट करून घेण्याचे ठरवले होते, असेही ती म्हणाली.
 
मग सर्वांनी धीर दिल्यावर संगीताने आईसोबत क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून तेथे इतर मुलींना होऊ नये म्हणून : माझ्या मुलीने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीची शाळेने दखल घेतली नाही. त्यामुळे त्या टवाळखोराची हिंमत वाढली. सुदैवाने माझी मुलगी वाचली. इतर मुलींना त्रास होऊ नये, म्हणून पोलिसांनी पावले उचलावीत. आरोपीला कडक शिक्षा करावी, अशी अपेक्षा मुलीच्या आईने व्यक्त केली. 
 
मागील काही महिन्यांपासून आरोपी कृष्णा (नाव बदलले आहे) संगीताला त्रास देत होता. ती शाळेत जात असताना किंवा परतत असताना तो तिला रस्त्यावर अडवून टोमणे मारायचा. दोन दिवसांपूर्वी त्याने तिच्या वर्गातील भिंतीवर तिच्या नावाने आक्षेपार्ह संदेश लिहिला. त्यामुळे प्रचंड दहशतीखाली आली होती. 
 
 शाळेत जाऊन वर्गातील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर, तक्रार केली होती पण... 
सहा महिन्यांपूर्वी त्याने पहिल्यांदा तिची छेड काढली. तेव्हा तिने पोलिस तसेच शिक्षकांकडे तोंडी तक्रार केली होती. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. शिक्षकांनी तिचीच कानउघाडणी केली. ‘अभ्यासाकडे लक्ष दे’, असे म्हणत यापुढे असे होणार नाही, याची काळजी घेऊ, असे आश्वासन दिल्याचे तिच्या आईने सांगितले. 
 
दरम्यान, घाटीतून डिस्चार्ज मिळाल्यावर चारच्या सुमारास संगीताला घेऊन तिची आई शाळेत गेली. तेथे त्यांनी तिच्या छेडखानीबद्दल जाब विचारला. शाळेने यापूर्वीची तक्रार गांभीर्याने घेतली असती तर हा प्रकार झाला नसता, असे सांगितले. पण शिक्षकांनी मौन बाळगले. तेथे उपस्थित सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी त्यांना ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. 
 
या क्रमांकावर तक्रार करा 
मुलींची छेडछाड होत असल्याचे दिसताच ०२४०-२२४०५००, १०९१, १०९८ आणि १०० क्रमांकावर संपर्क साधल्यास दामिनी पथक, पोलिस घटनास्थळी येतात. शाळांनीही दामिनी पथकाकडे तक्रार केली तर तत्काळ कारवाई केली जाते. 
बातम्या आणखी आहेत...