आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खाद्यतेल महागले; पामतेल, सोयाबीन दोन; तर करडी तेलाची 5 रुपयांनी भाववाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मान्सूनचे आगमन होऊन वीस दिवस उलटून गेले, तरी जोरदार पावसाची चिन्हे दिसत नसल्याने त्याचे पडसाद बाजारपेठेवर उमटत आहेत. त्याचा पहिला परिणाम खाद्यतेल महागण्यावर झाला आहे. मराठवाडा, विदर्भासह आंध्र प्रदेशातून करडी बियांची आवक कमी झाल्याने करडीच्या तेलाचा भाव पाच रुपयांनी वाढला आहे. त्यासोबत शेंगदाणा तेलही पाच, तर पाम, सूर्यफूल, सोयाबीन तेल दोन रुपये प्रतिलिटर महागले आहेत. करडीच्या एक लिटर डबल फिल्टर तेलासाठी 27 जूनपासून 95 ऐवजी 100, तर शेंगदाणा तेलासाठी 90 ऐवजी 95 रुपये मोजावे लागणार आहेत.

मोदी सरकार आल्यावर अच्छे दिन येणार, असेच प्रत्येकाला वाटत होते. प्रत्यक्षात डिझेल, रेल्वे दरवाढ झाली. गॅस, रॉकेलही महागण्याची चिन्हे आहेत. त्यात आता औरंगाबादेत तेल भाववाढीची भर पडली आहे.

आवक थंडावल्याने
महाराष्ट्राच्या सर्वच भागांत मेहकर, बुलडाणा, परभणी, हिंगोली तसेच आंंध्र प्रदेशातून करडीची आयात होते. मराठवाड्यात लासूर स्टेशन, जालना, मानवत रोड, सेलू येथे तेलाचे घाणे आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला करडी बियांची आवक थंडावते. परिणामी जुलै, आॅगस्टअखेरीस भाववाढ होते. मात्र, यंदा पावसाळा सुरूच झाला नसल्याने जूनच्या अखेरीसच करडी तेल महागले आहे. गुलमंडी येथील बसैये शुद्ध तेल भांडारचे व्यवस्थापक जगन्नाथ बसैये यांनी सांगितले की, तेलाची भाववाढ नैसर्गिक आहे. यात राज्यातील चव्हाण आणि केंद्रातील मोदी सरकारचा तर मुळीच दोष नाही.

रमजान, श्रावणाचा परिणाम
मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र मानल्या गेलेल्या रमजान महिन्यास सोमवारपासून सुरुवात होत आहे. मुस्लिम समाजबांधव रोजा सोडल्यानंतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी तेलाचा भरपूर वापर करतात. 27 जुलैपासून हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या श्रावण महिन्यास प्रारंभ होत आहे. त्या वेळीही तेलाचा प्रचंड वापर वाढतो. शिवाय पावसाळ्यात घरोघरी लोणचीही तयार केली जातात. ही बाब लक्षात घेऊन व्यापार्‍यांनी भाववाढ केली आहे.
पामतेल सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे भाववाढीचा तसा फटका सर्वसामान्यांना बसत नाही, असे प्रख्यात तेल विक्रेते कचरू वेळुंजकर यांनी सांगितले. शहरात दररोज किमान पाच ते सहा हजार लिटर (मॉल, शॉपिंग सेंटर्स वगळता) तेलाची विक्री होते, असेही ते म्हणाले.
सहा महिने भाववाढ राहणारच
तेल विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या सहा महिन्यांत सण, उत्सवाचा काळ असल्याने डिसेंबरअखेरपर्यंत भाववाढ कायम राहणार आहे. केंद्र, राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे पामतेलाची आवक वाढली, तर त्याची किंमत एक-दोन रुपयांनी कमी होऊ शकते. फेब्रुवारी-मार्चमध्ये करडीची आवक वाढल्यावर 20 रुपयांनी दर घसरण्याची शक्यता आहे.
(संग्रहित छायाचित्र)