आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळ प्रशासन-आरोग्य विभागाला इबोलाचा "संसर्ग'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इबोला तपासणी मोहिमेचा फज्जा उडाल्याचे "दिव्य मराठी'ने उजेडात आणल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. प्रवाशांची तपासणी करण्यासाठी विमानतळ प्रशासन सहकार्य करत नसल्याचा आरोप आरोग्य पथकाचे समन्वयक डॉ. गजानन पुराणिक यांनी केला. तर विमानतळाचे व्यवस्थापक डी.जी. साळवे यांनी आरोप फेटाळले असून आरोग्य विभागाला संपूर्ण सहकार्य करत असल्याचे स्पष्टीकरण दिले. मुंबई, दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची तपासणी होत असताना औरंगाबादमध्ये तपासणीची गरज नसल्याचे साळवे यांनी सांगितले. एकूणच आरोग्य विभाग आणि विमानतळ प्रशासन इबोला तपासणीबाबत गंभीर आजाराबाबत दक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.
विमानतळ प्रशासन प्रवाशांच्या तपासण्याची परवानगी देत नाही, शिवाय येथे रुग्णवाहिकाही उभी करू दिली जात नाही, त्यामुळे गुरुवारी फ्लाइट येण्याच्या वेळेवर तपासणी पथक हजर नसल्याचे सांगत डॉ. पुराणिक यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तर साळवे यांनी ही मोहीम औरंगाबादेत राबवणे व्यवहार्य नसल्याचे सांगितले व काही अटींवरच प्रवाशांची तपासणीची परवानगी देणे असे आठमुठे धोरण अवलंबल्याचे डॉ. पुराणिक यांचे म्हणणे आहे. एखादा इबोला संशयित शहरात दाखल झाल्यास याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१ साळवे यांच्या मते प्रत्येक परदेशी नागरिकाची आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी होते, मग औरंगाबाद विमानतळावर याची गरजच नाही.
प्रत्यक्षात असे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी केली असल्यास प्रवाशांना कार्ड अथवा पासपोर्टवर तपासणी झाल्याचा िशक्का द्यायला हवा. तसे केल्यास इतर विमानतळावर तपासणीची गरज नाही. देशात मात्र असा तपासणीचा पुरावा प्रवाशांना दिला जात नाही. त्यामुळे औरंगाबादसारख्या ठिकाणीही तपासणी गरजेची आहे.
२ डॉ. पुराणिक यांच्या मते, इबोलाबाबत आम्ही गंभीर आहोत. प्रत्येक प्रवासी डॉक्टरांपर्यंत पोहाेचावा यासाठी विमानतळ प्रशासनाने मदत करणे अपेक्षित आहे.
प्रत्यक्षात असे : इबोलाच्या तपासणीसाठी रक्ताचे नमुने घेतले जात नाहीत. पथकात अपुरे मनुष्यबळ. प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहोचण्यासाठी पाहिजे, तसे प्रयत्न होत नाहीत.
दुटप्पी धोरण

विमानतळ प्रशासन सहकार्य करत नाही. प्रवासी आमच्यापर्यंत आले तरच तपासणी करतो. प्रत्यक्षात प्रत्येकाची तपासणी गरजेची आहे.
डॉ. गजानन पुराणिक, विभागीय व्यवस्थापक, आरोग्य विभाग
तपासणीची गरजच
आरोप चुकीचा आहे. अाम्ही सहकार्य केले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची पूर्ण तपासणी केली जात असताना येथील तपासणीला अर्थ उरत नाही.
डी. जी. साळवे, व्यवस्थापक, विमानतळ