आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकास की भकास? जायकवाडीतील पुनर्वसितांचे प्रश्न अद्याप प्रलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- इको सेन्सिटिव्ह झोनमुळे जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसरात 10 किलोमीटर क्षेत्रातील शेती, उद्योग, सिंचनाबरोबरच जनजीवनही विस्कळीत होणार असल्याने या प्रस्तावाला शेतकर्‍यांबरोबरच राजकीय विरोधही होत आहे. पर्यावरणातील पक्षी-प्राण्यांबरोबरच माणसांनाही जगू द्या, अशी हाक शेतकर्‍यांनी दिली आहे. जायकवाडी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आधीच प्रलंबित आहेत. त्यातच हा इको सेन्सिटिव्ह झोनचा घाट घालण्यात येत असल्यामुळे शेतकर्‍यांचे जीवन अधिक दुष्कर होणार आहे.
दरम्यान, जायकवाडी पक्षी अभयारण्याभोवती 10 किलोमीटर परिसरातील इको सेन्सिटिव्ह झोन निर्मितीचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर आणि शेतकर्‍यांनी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी, मांडवा, पांढरओहोळ, सावखेडा, शंकरपूर, बोरुडी, महालक्ष्मीखेडा, मांगेगाव, देपकर वस्ती, कोंडापूर, जांझर्डी, पुरी, भिवधानोरा, पखोरा, गळणी, गणेशवाडी, अमळनेर, लखमापूर, कायगाव, जामगा, बगडी, ममदापूर, कानडगाव, नेवरगाव, हैबतपूर, आगरवाडगाव, धनगरपट्टी, वझर आदी गावे जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या क्षेत्राभोवताली लागू होणार्‍या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे प्रभावित होणार आहेत. सावखेडा व इतर प्रस्तावित गावे जायकवाडी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेली आहेत. या झोनमुळे शेती, उद्योग, सिंचन व्यवसाय आणि जनजीवन विस्कळीत होणार आहे. जायकवाडी प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेती, सिंचन व पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी आहे.
या प्रकल्पासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी काळ्या कसदार जमिनीसह घरादारांवर पाणी सोडले. पुनर्वसन होऊन 40 वर्षे पूर्ण झाली असून अद्याप अनेक गावांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यात इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यामुळे पुन्हा या गावांचे पुनर्वसन करावे लागू नये, अशी चिंता येथील नागरिकांना लागली आहे. मासेमारीचा व्यवसायही अडचणीत येणार आहे. पशुपक्षी निश्चितच जगले पाहिजेत; परंतु माणसांनाही जगू द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
बँकेकडून कर्ज घेऊन शेतकर्‍यांनी पाइपलाइन केली आहे. मशागतीसाठी ट्रॅक्टर खरेदी केले आहे. ते कर्ज कसे फेडावे ही चिंता शेतकर्‍यांना लागली आहे. इको सेन्सिटिव्ह झोन झाल्यास शेतकर्‍यावर आत्महत्याची वेळ येणार असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. सर्व घटकांवर होणार्‍या परिणामांचा विचार करून इको सेन्सिटिव्ह झोन तत्काळ रद्द करावा यासाठी जिल्हाधिकारी, गंगापूर तहसीलदारांना निवेदन दिले आहे. आज पालकमंत्री थोरात यांच्याकडे राज्यमंत्री डोणगावकर, सदाशिव गायके, विनोद काळे, किरण पाटील, कृष्णा सुकासे, संजय जाधव, संभाजी डोणगावकर, पंडितराव मुळे, किसनराव दुबिले, शिवाजी गावंडे, विक्रम बोरुडे आदींनी केली.