आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील ‘फोर्थ इडियट’ आठ वर्षांपासून साकारतोय इको-फ्रेंडली बाप्पा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पर्यावरणाचा सत्यानाश करणार्‍या नाना घातक पदार्थांपासून गणेशमूर्ती बनवणार्‍या जुन्या-जाणत्या मूर्तिकारांनी धडा घ्यावा असा अफलातून प्रयोग बारा वर्षांचा एक बालक गेल्या आठ वर्षांपासून करतो आहे. इको-फ्रेंडली म्हणजे काय याचा अर्थही त्याला माहीत नसताना वयाच्या चार वर्षापासून गणेशाला ‘फ्रेंड’ बनवून तो त्याच्या निर्मितीच्या साधनेत मग्न होतो. कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनवण्याचा त्याचा अखंड ध्यास सुरू आहे. यंदाही त्याने हा वसा जपला आहे. सर्वेश वरधावे असे त्याचे नाव! शिक्षिका त्याला फोर्थ इडियट म्हणतात.

सरस्वती भुवन कॉलनीत तो राहतो आणि सुपारी मारुती येथील शिशु विकास केंद्र शाळेत तो शिकतो. बालपणीच माय फ्रेंड गणेशा म्हणत आखीव-रेखीव मूर्ती निर्मितीचा श्रीगणेशा करणार्‍या आणि नक्षीदार रंगकामाचे नवे तंत्र शोधून काढणार्‍या करामती सर्वेशला त्याच्या शाळेत ‘फोर्थ इडियट’ म्हणतात. मूर्ती निर्मितीचे त्याचे एकमेव सूत्र ते म्हणजे कागदाचा लगदा आणि शाडूची माती. शाडूची माती मिळत नाही म्हणून पीओपीच्या मूर्ती आम्ही घडवतो, असा कंठशोष करणार्‍या तमाम मूर्तिकारांना या बालकलावंताने चपराक दिली आहे.

मोठय़ा मुलांना कागदाच्या लगद्यापासून खेळणी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात असताना सर्वेश एकाग्रतेने बघायचा. त्यानंतर सर्वेशने तशाच गणेशमूर्ती बनवून पाहिल्या. त्याची तळमळ पाहून मुख्याध्यापिका विद्या भास्कर यांनी मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुबक गणेशमूर्ती घडवण्याची किमया बघून सरस्वती भुवन कॉलनीतील भाविकांनी मूर्ती बनवण्याची विनंती केली. या वर्षी त्याने तीन इंचांपासून तीन फुटांपर्यंतच्या 40 मूर्ती घडवल्या आहेत. निपुण मूर्तिकाराला लाजवेल असे अप्रतिम, रेखीव काम तो मातीच्या गोळ्यावर करतो. सर्वेशचे वडील संदीप वरधावे नवभारत शिक्षण संस्थेचे सचिव असून दरवर्षी गणपतीसाठी ते आकर्षक देखावे तयार करतात.

आजारी आईच्या सलाइनमुळे सुचली रंगस्प्रेची कल्पना
जि. प. मैदानावर पंधरा दिवस तो दररोज मूर्तिकारांचे रंगकाम पाहायचा. एकेदिवशी मूर्तिकाराने त्याला हुसकावून लावले. त्या दिवशी तो घरी येऊन खूप रडला आणि त्या मूर्तिकारापेक्षा चांगली मूर्ती घडवण्याचा जणू चंगच बांधला. त्यातूनच त्याने रंग देण्याचे साहित्य बनवले. घरात आई सतत आजारी असल्याने तिला सलाइन लावले जात होते. त्याची नळी काढून पेन व होमिओपॅथिक औषधाच्या डबीचा वापर करून त्याने स्प्रेसारखे तंत्र विकसित केले आणि मूर्तींना आकर्षक रंग दिले. कधी तोंडाने फुंकून, तर कधी फुग्यामध्ये हवा भरून तो मूर्तींना रंग देतो.

आमच्या शाळेतील ‘फोर्थ इडियट’
कल्पनाशक्ती आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे आकर्षक मूर्ती घडवणारा सर्वेश ‘थ्री इडियट्स’ प्रमाणे फोर्थ ‘इडियट’ आहे. तो अभ्यासातही प्रचंड हुशार आहे. ब्रश, स्प्रे यांची नवनिर्मिती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
-विद्या भास्कर, मुख्याध्यापिका, शिशुविकास केंद्र.