आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण रक्षणाचा श्रीगणेशा! यंदा ९६ टक्के शाडू मातीच्या श्रींची स्थापना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पर्यावरणाच्या असमतोलामुळे माणसाला जीवनशैलीत बदल करावाच लागतो. याची प्रचिती आता सण उत्सवांमध्ये प्रकर्षाने येत आहे. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण करू लागल्या. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तींकडे गणेशभक्तांचा कल वाढला. शाडू मातीच्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात स्थापना होऊ लागली. विशेष म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ शहरातील बालगोपाळांनी दोन-तीन वर्षांपूर्वी रोवली अन् पाहता पाहता ९६ टक्के शहरात शाडू मातीच्या गणेशमूर्ती विराजमान होऊ लागल्या. यंदा फक्त गणेश मंडळांतील मोठ्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत, तर इतर सर्व शाडू मातीच्याच आहेत. विविध शाळांत आयोजित कार्यशाळांच्या माध्यमातून लाखांच्या घरात गणेशमूर्ती तयार झाल्या. महिला मंडळे अन् सामाजिक संस्थांनीही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लाखांच्या आसपास गणेशमूर्ती घडवल्या. याशिवाय कलावंतांनी ५० ते ७० हजार मूर्ती तयार केल्या. शाडूची मूर्तीच द्या, अशी मागणी गणेशभक्त करत आहेत, असे शाडूचे गणपती बनवणारे प्रभू इंगळे यांनी सांगितले.
श्रींच्या स्थापनेचे मुहूर्त : घरगुती गणेश स्थापना सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत (२ वाजेपर्यंत) करता येईल. सार्वजनिक गणेश मंडळांनी दुपारी ते सूर्यास्तापूर्वी स्थापना करणे इष्ट राहील, असे रामकृष्ण बारहाते गुरुजी यांनी सांगितले.
आदेशाला हरताळ :
गणेशमूर्तींची विक्री रस्त्यांवर होऊ देणार नाही. मैदानात स्टॉल लावून विक्री केली जाईल, असे मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी सांगितले होते. मात्र, गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला सेव्हन हिल्स ते गजानन मंदिर, टीव्ही सेंटर चौक, औरंगपुरा हे गजबजलेले रस्ते गणेशमूर्तीच्या दुकानांनी फुलून गेले होते. त्यामुळे रविवारी वाहतुकीची कोंडी झाली.
बातम्या आणखी आहेत...