आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्या हातांनी साकारली इको-फ्रेंडली गणेशमूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेशोत्सवासारखा सण साजरा करताना हल्ली पर्यावरण संरक्षणाचा प्रामुख्याने विचार होतो. शहरातील १३ वर्षांचा सर्वेश वरधावेही मागील नऊ वर्षांपासून एखाद्या निष्णांत मूर्तिकारालाही लाजवेल अशा पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारत आहे. त्याने तयार केलेल्या मूर्ती घेण्यासाठी अख्ख्या कॉलनीतील मंडळी महिना अगोदरपासून बुकिंग करून ठेवतात. यंदा सर्वेशच्या चिमुकल्या हातांनी वर्तमानपत्रांच्या ५०० किलो रद्दीपासून साकारलेली आठ फुटी चित्ताकर्षक मूर्ती सर्वांचे लक्ष वेधत आहे.

एसबी कॉलनीमध्ये राहणाऱ्या सर्वेशचे वडील संजीव हे एका इलेक्ट्रिक कंपनीत कामाला असून ते घरातील गणेशोत्सवासाठी अत्यंत आकर्षक सजावट करतात. ते पाहून सर्वेशला चार वर्षांचा असल्यापासून गणेशमूर्ती साकारण्याचा छंद जडला. यंदा सर्वेशने शाडू माती आणि पेपरच्या रद्दीचा वापर करून गणेशमूर्ती घडवल्या. यातील बारकाईपूर्ण नक्षीकाम, रंगकामही त्याने स्वत:च केले आहे. दरवर्षी तो मोजक्या मूर्ती साकारायचा. परंतु कॉलनीतील सर्व लोकांनी मूर्तीसाठी आग्रह धरल्याने स्वत: रबरी साचा तयार करून यंदा विविध थीम घेत त्याने जवळपास ५० मूर्ती साकारल्या आहेत. त्यात वेलवेटचे रंग भरल्याने या मूर्ती आकर्षक दिसत आहेत. कॉलनीतील लहान मुलांना तो मूर्ती मोफत देतो. तर त्याच्याकडून मूर्ती नेणारे अनेकजण मातीचा खर्च म्हणून स्वखुशीने त्याला पैसे देतात. मागील वर्षी त्याने सलाइनच्या आयव्हीचा वापर करून स्प्रे तयार केला होता. त्याद्वारे मूर्तींवर रंगकाम केले होते.

पर्यावरण जपण्याला महत्त्व
मूर्ती घडवत असताना परिसरातील नागरिक त्याच्याकडून मूर्ती घेण्यासाठी बुकिंग करून ठेवतात. नववीत शिकणाऱ्या सर्वेशला घरातील सर्वच प्रोत्साहन देतात. अधिकाधिक सुबक, आकर्षक गणेशमूर्ती घडवता याव्यात म्हणून तो ठिकठिकाणी हजेरी लावून नवनवे तंत्रज्ञान, कला आत्मसात करण्याचाही प्रयत्न करतो.