आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रांतानुसार बदलताे अबीरचा अर्थ, महाराष्ट्रातही वेगळे संदर्भ; रंगपंचमीला अबीर-गुलालाची उधळण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रंगपंचमीला अबीर-गुलालाची उधळण केली जाते. मात्र, अबीर म्हणजे नेमके काय याबाबत कमालीचा संभ्रम आहे. उत्तर भारत आणि महाराष्ट्रातील शैव- वैष्णव परंपरेनुसार याचे अर्थ घेतले जातात. उत्तर भारतात गुलाल वगळता अन्य रंग मिश्रित केल्यावर तयार होणारा रंग म्हणजे अबीर, तर महाराष्ट्रातील संत परंपरेत पांडुरंगाला प्रिय तो अबीर. हा अबीर म्हणजे बुक्का असा अर्थ निघतो. 
 
औरंगाबादेतील होळीचे रंग आणि आयुर्वेदिक औषधीचे मोंढ्यातील व्यावसायिक अमितकुमार संचेती यांच्या मते शैव पंथातील नागरिक कपाळाला लावतात ती पांढरी भुकटी म्हणजे अबीर. होळीच्या काळात यात चमकी टाकून तो फॅन्सी स्वरूपात विकला जातो. याच्या १०० ग्रॅम पाकिटाची किंमत १५ रुपये आहे. या प्रकारातील अबीर मुख्यत्वे गुजरातहून येतो. शहरात यास मागणी नसल्यामुळे फार तर एक ते सव्वा क्विंटल अबीरच शहरात येत असल्याचे ते सांगतात. होळीत गुलालाला फार मागणी नसते. तो गणेशोत्सवात अधिक चालतो. तीन प्रकारांत मिळणारा गुलाल ६, १२ आणि १८ रुपये किलोने मिळतो. मराठवाडा वारकरी समाजाचे अध्यक्ष नवनाथ आंधळे महाराज यांच्या मते महाराष्ट्र आणि उत्तर भारतात अबीर शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. वृंदावन येथील कृष्णाचे उपासक अमृतानंद महाराजांशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, गुलाल सोडून अन्य सर्व रंग एकत्रित केल्यानंतर तयार होणाऱ्या रंगाला अबीर असे म्हटले जाते. कृष्णलीलेत याचे खूप महत्त्व आहे. 
 
अबीर-गुलालकी धूम मचाई, झुलत राधा संग, 
भर पिचकारी रंग, गिरिधर झुलत राधा संग 
अशीसंत मीराबाईची गवळण प्रसिद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मथुरा, वृंदावनातील रंगपंचमीत अबीरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. आंधळे महाराजांच्या मते, संत तुकारामाचा अभंग ‘अबीर-गुलाल उधळत रंग’ यामध्ये अबीरचा अर्थ गुलाल आणि कुंकू असा होतो. अनेक जणांना अबीर म्हणजे बुक्का असा समज होतो. परंतु बुक्का म्हणजे अबीर नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. बुक्का हा तुळशीपासून तयार होतो. तुळशीच्या काड्या जाळून त्याची वस्त्रगाळ तयार करायची. ती गाळून त्यात कापूर मिश्रित करून तयार होणारी भुकटी म्हणजे अबीर असे ते म्हणाले. पंढरपूर, पुणे, आळंदी येथून अबीर शहरात येत असल्याचे ते म्हणाले. 
 
अाध्यात्मिक गुरू मुकुंदकाका जाटदेवळीकर यांच्या मते महाराष्ट्रात अबीरचा अर्थ बुक्का असा होतो. पांडुरंगाला प्रिय तो बुक्का, हा बुक्का म्हणजेच अबीर असे संत वाङ््मय आणि संत शब्दकोशात नमूद असल्याचे मुकुंदकाका सांगतात. कर्थरथी लोकांत बुक्का उधळण्याची परंपरा आहे. 

अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशात अबीर म्हणजे चंदन, तुळस, कापूर यांचे सुगंधी चूर्ण असा अर्थ आहे. हिंदीतील प्राकृतिक शब्दकोशानुसार अबीर म्हणजे अभ्रकाचे चकचकीत चूर्ण. त्यात काही मिसळले असले तरी त्यास अबीरच म्हटले जाते. यात लाल रंग मिसळून तो रंगपंचमीला वापरतात. संत शब्दकोशाप्रमाणे अबीर म्हणजे कुंकू, गुलाल तसेच एक पांढऱ्या रंगाचा चूर्ण असा अर्थ आहे. अबीरचा पूजेसाठी वापर होतो. काही प्रसंगात अबीर उधळले जातात. 
 
पश्चिम बंगालमध्ये होतेय जास्त उत्पादन 
हिब्रूमध्येअबीर शब्दाचा धाडस असा अर्थ आहे. अरबी भाषेत अबीरचा अर्थ सुंगधी अर्क असा आहे. नेपाळात अबीरला डाय पावडर म्हटले जाते. बंगाली भाषेत अबीरचा अर्थ मावळतीच्या वेळी होणारा आकाशाचा लाल, गुलाबी आणि भगवा रंग असा आहे. अबीर अपराजिता, मेरीगोल्ड, हिबीसकस आणि दोपाती या फुलांच्या अर्कापासून तयार केला जातो. हा अर्क नंतर अभ्रकाच्या भुकटीसोबत मिसळून रंग तयार होतो. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन होते. हा रंग त्वचेसाठी हानिकारक नसल्याचे जाधवपूर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुख सिद्धार्थ दत्ता सांगतात. 
बातम्या आणखी आहेत...