औरंगाबाद- महिला बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक उभारणी होत आहे. चांगले काम करणा-या महिला बचत गटाला बँकेकडून 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्जदेखील देण्यात येत आहे. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती शक्य असल्याचे मत जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनंत घाटे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने गुरुवारी अल्पबचत योजना या विषयावर आयोजित शिबिरात ते बोलत होते.घाटे म्हणाले, बांगलादेशमध्ये बचत गटांची मोहीम जोरदार राबवली होती. ते पाहून 1990 नंतर भारतातही काही नियम बनवून बचत गट सुरू करण्यात आले. बचत गटाला नाव देऊन बँकेत खाते उघडता येते. यामध्ये दोन किंवा तीन व्यक्तींना हे व्यवहार करता येतात. बचत गटाची नियमित बैठक, त्यांची होणारी बचतेची रक्कम पाहून सहा महिन्यांत बँकेच्या माध्यमातून कर्ज दिले जाते,असे घाटे यांनी सांगितले. जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव त्रि.बा.जाधव, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक उमेश कहाटे, नाबार्डचे विभागीय अधिकारी आर. एम. महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशात 73 लाख महिला बचत गट असून 80 टक्के बचत गट महिलांचे आहेत. ते पुरुषांच्या तुलनेत कायम टिकतात. राज्यात आज सात लाख बचत गट असून त्या माध्यमातून 700 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. महिला बचत गटामुळे आज छोट्या कर्जासाठी सावकाराकडे जावे लागत नसल्याने नाबार्डचे अधिकारी आर. एम. महाजन यांनी सांगितले. महिलांसाठी योजना आहेत. मात्र, त्या योग्यरीत्या समजावून घेण्याची गरज असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले. प्राधिकरणाकडून गरिबांना वकील, त्यांचा खर्च केला जातो. तसेच कमी उत्पन्न असणाºया दारिद्र्यरेषेखालील लोकांना कायदेशीर सल्ला मोफत दिला जातो.