आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यासाठी लढणारा अर्थतज्ज्ञ हरपला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून मराठवाड्याच्या विकासाचा मुद्दा कायम ऐरणीवर आणणारे, त्यासाठी शेवटपर्यंत लढणारे डॉ. आर. पी. कुरुलकर यांच्या निधनामुळे मराठवाड्याच्या चळवळीचा कणाच हरपला आहे अशा शब्दांत मान्यवरांनी कुरुलकर यांना द्धांजली वाहिली.

राम भोगले (अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबाद) : डॉ. कुरुलकर यांच्या निधनाने मराठवाड्याविषयी सखोल विचार, चिंतन करणारे व्यक्तिमत्त्व हरपले. मराठवाड्याच्या विकासाबाबत ते कायम हिरीरीने आपली मते मांडत. मराठवाडा जनता विकास परिषदेत ते सक्रिय सहभागी होत.

प्रदीप पुरंदरे (जलतज्ज्ञ): वाल्मीत असताना त्यांच्याशी माझा संपर्क आला. पाण्याच्या अर्थशास्त्रावर त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन मोलाचे असे. त्यांनी केलेल्या विश्लेषणाचा कायम उपयोग होत राहील.

अँड. विष्णू ढोबळे (सामाजिक कार्यकर्ते) : त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून मराठवाड्याच्या विकासावर केलेले चिंतन अतिशय मौलिक आहे. त्यांनी चळवळीचा कायम सकारात्मक विचारच केला.

डॉ. शरद अदवंत (संचालक स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था): शाळेत असताना डॉ. कुरुलकर माझे शिक्षक होते. त्यानंतर ते प्राध्यापक झाले व पुढे एक एक मोठे पद भूषवत त्यांनी आपली ओळख निर्माण केली. अर्थशास्त्र हा जरी त्यांचा विषय असला तरी ते विकासाचे अभ्यासक होते.

मुकुंद कुलकर्णी (सदस्य, वैधानिक विकास मंडळ): सखोल अभ्यास, स्पष्ट विचार आणि मृदू वाणी यांचा वापर करीत डॉ. कुरुलकर यांनी कायम मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न राजकीय नेतृत्व आणि प्रशासनासमोर मांडले. त्यांच्या जाण्याने ज्ञानी माणूस हरपला.

डॉ. विजय पांढरीपांडे (कुलगुरू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद): त्यांच्या निधनाने धक्का बसला आहे. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे चांगला सदस्य गमावला आहे.

मधुकरराव चव्हाण (पशुसंवर्धन मंत्री) : मराठवाड्याच्या प्रत्येक क्षेत्रातील अनुशेष त्यांनी काढला. विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी ते सातत्याने आमचा पाठपुरावा करत होते. त्यांच्या निधनाने एक तळमळीचा सहकारी मित्र गमावल्याचे दु:ख आहे.

राजेश टोपे (माजी मंत्री) : मराठवाड्याच्या विकासामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान होते. माझ्यासारख्या तरुण नेत्यांना त्यांचे मोलाचे मार्गदन मिळत होते.

चंद्रकांत खैरे (खासदार,औरंगाबाद) : अत्यंत तळमळीचे, अभ्यासू आणि मार्गदक व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या निधनाने मराठवाड्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

व्यंकटेश काब्दे (अध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद) : मराठवाडा वैधानिक विकास मंडळ आणि केळकर समितीचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले कामही महत्त्वपूर्ण होते. त्यांच्या निधनाने मराठवाडा विकास परिषद आणि स्वामी रामानंद तीर्थ संस्थेचा एक आधारस्तंभ कोसळला आहे.

एच. एम. देसरडा (अर्थतज्ज्ञ) : मिलिंद महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागात मी त्यांच्यासोबत प्राध्यापक म्हणून काम केले आहे. काही परिषदांमध्ये आम्ही एकत्र संशोधनपर लिखाणही केले. मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारा सहकारी गेला याचे दु:ख आहे.

प्रा. विजय दिवाण (पर्यावरण अभ्यासक) : मराठवाड्यातील दरडोई उत्पन्न, रोजगार स्थिती, आरोग्याची स्थिती, मानव विकास निर्देशाकांचे ते अभ्यासक होते. जिल्हावार विकास नियोजनाचे आराखडे त्यांनी तयार केले होते. मराठवाड्याचा अनुशेष किती आणि तो कोणत्या भागाने किती निधी पळवला, याबद्दल त्यांचा दांडगा अभ्यास होता.

राजेंद्र दर्डा (शालेय शिक्षण मंत्री) : मराठवाड्याच्या विकासासाठी सातत्याने कृतिशील असणारा थोर भाष्यकार आज आपल्यातून हरपला. अनुशेष असो की मराठवाड्यासाठी आर्थिक तरतूद प्रत्येक वेळी त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती.