आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळा, विक्रेते, प्रकाशकांची साखळी; 80 टक्के पुस्तके ‘खास’गी, त्यात पडते स्टेशनरीची भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिक्षण क्षेत्रात खासगी शाळा आणि महाविद्यालयांनी दबदबा निर्माण केला आहे. हीच बाब या शाळांमध्ये लागणार्‍या पुस्तकांच्या बाबतीतही होत आहे. सीबीएसई शाळांमध्ये सरकारी एनसीईआरटीने प्रकाशित केलेली पुस्तके वापरणे बंधनकारक असताना येथे सोबत सर्रास खासगी प्रकाशकांचीच पुस्तके वापरली जातात. विशिष्ट दुकानांमधूनच खरेदीचे बंधन लादले जाते. हे रॅकेट कसे चालते? का पालकांना नेमक्या शाळांमधून पुस्तके घ्यावी लागतात? शाळांना यातून काय फायदा होतो? याचा तपास डीबी स्टार चमूने केला. त्यातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या.

औरंगाबाद शहरात केवळ 20 टक्के पुस्तके एनसीईआरटीची आहेत. बाकी पुस्तके खासगी प्रकाशकांनी बाजारात आणली आहेत. आजघडीला 60 हून अधिक खासगी प्रकाशक आहेत. कुणालाही प्रश्न पडेल, अभ्यासाबाहेरची खासगी पुस्तके देण्यात शाळांचा फायदा काय? त्याचे उत्तर आहे, मोनोपॉली तयार करणे. एनसीईआरटीच्या पुस्तकांचा तुटवडा त्यामागे एक कारण दिले जाते. तुटवडा जाणीवपूर्वक तयार करण्याचा आरोप एनसीईआरटीवर होतो.

लोकसभेतही गाजला मुद्दा
देशभरात एनसीईआरटीच्या पुस्तकांचा तुटवडा जाणवत असतो. यावर अनेक राज्यांत पालकांनी आंदोलनेही केली आहेत. तत्कालीन खासदार जगदीश ठाकूर यांनी डिसेंबर 2013 मध्ये या विषयावर लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. सीबीएसईने आपल्या शाळांमध्ये एनसीईआरटीची पुस्तके वापरण्यास सक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत काय? काही खासगी प्रकाशक एनसीईआरटीची पुस्तके छापून ती चढ्या दराने विकत असल्याची
शासनाला माहिती आहे का? असे गंभीर प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केले होते. या प्रश्नांवर उत्तरे देताना तत्कालीन मनुष्यबळविकास मंत्री डॉ. शशी थरूर यांनी 2005-06 या शैक्षणिक वर्षापासूनच सर्व सीबीएसई संलग्नित शाळांमध्ये केवळ एनसीईआरटीचीच पाठ्यपुस्तके वापरण्याची सक्ती केल्याचे स्पष्ट केले. या शाळांनी खासगी प्रकाशकांची पुस्तके वापरू नयेत, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिल्याचेही त्यांनी सांगितले होते. सीबीएसईच्या नियमावलीतही एनसीईआरटीची पुस्तके वापरणे आवश्यक असल्याचे नमूद आहे.
नेमकी परिस्थिती उलटी
प्रत्यक्षात परिस्थिती याच्या नेमकी विरुद्ध आहे. राज्यातच नव्हे, तर देशभरात एनसीईआरटीच्या पुस्तकांचा कायम तुटवडा असतो. एनसीईआरटीची पुस्तके अगदी नाममात्र दरात मिळतात, तर खासगी प्रकाशकांची पुस्तके एनसीईआरटीच्या तुलनेत चार पटीहून अधिक महाग आहेत. शाळा पुस्तक विक्रेत्याला वर्षभराची आॅर्डर देतात. त्यांना कोणत्या प्रकाशकांची पुस्तके हवी आहेत हे नमूद करतात, तर पुस्तक विक्रेते प्रकाशकांना आॅगस्ट महिन्यातच पुढील शैक्षणिक वर्षाची आॅर्डर देऊन टाकतात. एनसीईआरटीची पुस्तके मिळत नसल्यामुळे खासगी प्रकाशकांची पुस्तके घ्यावी लागत असल्याचे ते सांगतात. यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
एनसीईआरटीचा राज्यांवर आरोप
एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या तुटवड्यावर दिल्ली उच्च् न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आपली बाजू मांडताना एनसीईआरटीने महाराष्ट्रासह गोवा, हरियाणा, उत्तरांचल, केरळ, सिक्कीम, हिमाचल प्रदेश या राज्यांकडून अचानक मागणी वाढल्यामुळे पुरवठा करण्यात अडचण होत असल्याचे शपथपत्र सादर केले होते. सध्या मागणीच्या 50 टक्के पुरवठा करणेही एनसीईआरटीला शक्य होत नाहीय. देशभरात सीबीएसई शाळांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या शाळांकडून ही मागणी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यामुळे खासगी प्रकाशकांचे फावत आहे.

स्टेशनरीतून कमाई
एकीकडे अनावश्यक पुस्तकांचा मारा होत असताना ते विकत घेण्यासाठी एकाच दुकानाची सक्ती केली जाते. विद्यार्थ्यांच्या हातात थेट याद्या सोपवल्या जातात. हे सामान कोणत्या दुकानात असेल याची माहिती देतात. पालकही रांगा लावून ते घरी आणतात. एखाद्या पालकाला वेगळ्या ब्रँडच्या, थोड्या कमी किमतीच्या वह्या किंवा ओळखीच्या दुकानातून सवलतीत हे साहित्य घेण्याची इच्छा असते; पण शाळा त्यास परवानगी देत नाही. यामुळे पालकांवरील आर्थिक बोजा कसा वाढतो हे आम्ही कालच्या भागात उघड केले आहे. त्यात अनावश्यक स्टेशनरी पालकांच्या माथी मारली जाते. कव्हर, स्टिकर, रंग, रबरपासून दप्तरापर्यंत वाढीव दरात विकले जात आहे.
अचानक मागणी वाढली
आमच्याकडे पुस्तकांची मागणी अचानक वाढली आहे. तरीही आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोच. कुठलीही अडचण येऊ नये म्हणून जर आमच्याकडे योग्य वेळी मागणी नोंदवायला हवी. उशिरा आॅर्डर देणार्‍यांना पुस्तके पुरवण्यात आम्ही असमर्थ आहोत.
-बी. आर. त्रिपाठी, सचिव, एनसीईआरटी, नवी दिल्ली

चार चकरा मारल्या

आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना किफायतशीर दरात एनसीईआरटीची पुस्तके मिळावीत यासाठी मी स्वत: चार वेळा एनसीईआरटीच्या कार्यालयात गेलो होतो. पण त्यांचा ‘अ‍ॅप्रोच’ चांगला नाही. ते लोक सहकार्य करण्यास तयार नसतात. यामुळे खासगी प्रकाशकांशिवाय पर्यायच राहत नाही.
-अविनाश फुरसुले, पुस्तक विक्रेता, सिडको

आमचा व्यवसायापुरता संबंध

पुस्तक आणि स्टेशनरी विक्री हा आमचा व्यवसाय आहे. पाठ्यपुस्तकांच्या विक्रीसाठी काही शाळांसोबत आम्ही टायअप केले आहे. यामुळे पालकांना सर्व साहित्य एका ठिकाणी मिळते. त्यांची सोय होते. शाळा सांगतात त्याप्रमाणे आम्ही या साहित्याची विक्री करतो.
-आर. एल. स्वामी, पुस्तक विक्रेता, औरंगपुरा
काय म्हणतात शाळा सक्ती करत नाही
४आम्ही सर्वसामान्य पालकांचा विचार करूनच वह्या-पुस्तके आणण्यास सांगतो. हे साहित्य एकाच दुकानातून घेण्याची सक्ती करत नाही. आम्ही राज्याचा अभ्यासक्रम चालवतो. पाठ्यपुस्तक मंडळाने नमूद केलेल्या पुस्तकांशिवाय इतर एकही पुस्तक आमच्या शाळेत नाही.-
-प्रवीण सावरगावकर, स्वामी विवेकानंद अकॅडमी

ही मुलांची गरज

४आम्ही राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबवतो. यातील पुस्तके तर मुले वापरतातच, शिवाय त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून आम्ही इतर पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. ही काळाची गरज आहे. यामुळे मुलांचे ज्ञान समृद्ध होते. प्रत्येक पुस्तकावर परीक्षाही घेतो. यात पालकांची तक्रार नसते.
-संतोष म्हस्के, भास्कराचार्य इंग्लिश स्कूल

सर्व पुस्तके आवश्यक

४आम्ही एकही पुस्तक जास्तीचे घेण्यास भाग पाडत नाही. प्रत्येक पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. पालकांना त्रास असेल तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी. पालकांच्या सोयीसाठीच आम्ही सर्व पुस्तके व स्टेशनरी एका दुकानात मिळण्याची व्यवस्था केली आहे.
-मंजित कौर, सेंट जॉन इंग्लिश स्कूल

ज्ञानाची भूक वाढली

४पूर्वी साडेसहा वर्षांचे मूल पहिलीत जायचे. आता ते अडीच वर्षांचे होताच शाळेत जाते. पहिलीत पोहोचेपर्यंत त्याला कर्सिव्हपर्यंत लिहिणे जमू लागते. वाचनाचीही सवय लागते. आजच्या मुलांची ज्ञानाची भूक वाढली आहे. म्हणून आम्ही इतर पुस्तकांतून त्यांचे ज्ञान समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. शासनाने ही गरज ओळखून अभ्यासक्रमात बदल करणे गरजेचे आहे.
-संदीप राजहंस, चाटे समूह

आमची मुले हुश्शार

४आपला अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकांवर आधारित आहे. काही खासगी शाळा त्याच्या जोडीला पूरक साहित्याचा वापर करतात; पण हा खर्च आमच्या मुलांना परवडणारा नसतो. आपली परीक्षा पद्धत ही पाठ्यपुस्तकांवर आधारलेली आहे व मूल्यमापनही मार्कांवरून होते. शिवाय राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने तयार केलेली पुस्तके परिपूर्ण आहेत. त्यांचा अभ्यास करून आमच्या मुलांनी आयएएस होण्यापर्यंत झेप घेतली आहे. आमची मुले संघर्ष करतात. यातून त्यांना जीवन जगण्याची कला अवगत होते. त्यांच्यात आत्मविश्वास येतो. हा विश्वास पुस्तकांतून येणे शक्य नाही.
-संजीव सोनार, मुख्याध्यापक, प्रियदर्शिनी इंदिरानगर माध्यमिक विद्यालय