औरंगाबाद - एक शहर, एक शैक्षणिक वर्ष, सारखाच अभ्यासक्रम आणि एकच वर्ग... पण पुस्तकांची संख्या, त्यांचे प्रकाशक आणि नावे वेगवेगळी. वह्या व इतर स्टेशनरीतही कमालीचा फरक. शहरातील खासगी शाळांची ही अवस्था. शिक्षण खात्याला दुकानदारी होत असल्याचे मान्य, पण कारवाईच्या नावावर ‘धडे’. शाळांच्या दुकानदारीत पालकांच्या खिशावरील आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे वाढते. शिक्षणाच्या बाजारातील व्हाइट कॉलर लुटीचा पर्दाफाश ‘डीबी स्टार’ या वृत्त मालिकेतून करत आहे.
पूर्वी शाळांचे प्रकार हे सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित एवढेच असायचे. इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी आणि उर्दू अशा भाषांनुसार माध्यमात शाळांची विभागणी होत होती. दोन-तीन सीबीएसई शाळा वगळता विविध बोर्डांच्या शाळांची लाट नव्हती. शाळांमध्ये महाराष्टÑ राज्य पाठ्यपुस्तक मंडळांची पुस्तकेच लागायची; पण शाळांचा बाजार फोफावत गेला आणि दुकानदारी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अनेक खासगी शाळांनी शोधून काढल्या. पुस्तकांच्या माध्यमातून पालकांचा खिसा कसा कापला जातो. ते आजच्या भागात उघड करत आहोत.
पुस्तकांची संख्या दुप्पट
शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे शालेय स्तरावर मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास-भूगोल-नागरिकशास्त्र हे महत्त्वाचे विषय असतात. काही वेळेस द्वितीय भाषा म्हणून संस्कृत, उर्दू असे पर्याय असतात, तर चित्रकला, क्रॉफ्ट, संगीत, खेळ हे पाठ्यपुस्तके नसणारेही विषयही शिकवले जातात. या विषयांसाठी एक पाठ्यपुस्तक, एक क्लासवर्क, तर एक गृहपाठाची वही लागते. जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि जुन्या अनुदानित शाळांमध्ये आजही एवढेच शैक्षणिक साहित्य लागते, पण खासगी शाळांना बहुधा हा अभ्यासक्रम मान्य नसावा. यामुळेच त्यांनी या सक्तीच्या विषयांसह अभ्यासक्रमात अनेक पुस्तकांचा समावेश केला आहे. त्यामुळे पुस्तकांची संख्या दुप्पट झाली असून त्याचा मुले आणि पालक अशा दोघांनाही ताप होतोय.
डीबी स्टार स्टिंग
डीबी स्टारने देवगिरी ग्लोबल अकॅडमी, नरेंद्र विद्यामंदिर, अगस्ती सेमी इंग्लिश, स्वामी विवेकानंद अकॅडमी, एसबीओए, सेंट जॉन इंग्लिश स्कूल, भास्कराचार्य इंग्लिश स्कूल, एमयू इंटरनॅशनल या आठ शाळांतून पालकांना दिली जाणारी पाठ्यपुस्तके आणि स्टेशनरीची यादी मिळवली. ही यादी 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी पाचवीच्या इयत्तेसाठीची आहे. या सर्व शाळा राज्य मंडळाचा अभ्यासक्रम चालवतात. यादीतील पुस्तके , वह्या आणि इतर स्टेशनरी यांची संख्या चकित करणारी आहे. प्रातिनिधिक स्वरूपात शाळा आणि एका इयत्तेची निवड केली आहे. सर्वच वर्गासाठी अनेक शाळांमध्ये अशाच प्रकारची कात्री वापरली जाते.
जड झाले ओझे
अभ्यासक्रम असतानाही प्रत्येक शाळेची मागणी वेगवेगळी आहे. पुस्तकांची संख्या बदलल्याने वह्यांची संख्याही बदलत गेली. एकीकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गत शासन दप्तराचे ओझे कमी करण्याच्या गोष्टी करते, तर दुसरीकडे खासगी शाळांच्या उद्योगामुळे मुलांच्या खांद्यावरील ओझेही वाढतच चालले आहे.
उद्दिष्टे तपासावी लागतील
आता अनेक शाळा संगणक, प्रोजेक्टरद्वारे शिक्षण देत आहेत. यातून दप्तराचे ओझे कमी होण्याला हातभार लागतोय; पण जर काही शाळा अभ्यासक्रमाबाहेरील पुस्तकांची सक्ती करत असतील, तर त्याची माहिती घ्यावी लागेल. शिवाय या पुस्तकातून कोणती उद्दिष्टे सफल होत आहेत, हे तपासण्याची सूचना देऊ.
-सुधाकर बनाटे, विभागीय शिक्षण उपसंचालक
शासनाची पुस्तके परिपूर्ण
४पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तके परिपूर्ण आहेत. आतापर्यंत हा अभ्यासक्रम शिकूनच आदर्श लोक तयार झाले आहेत. या पुस्तकांव्यतिरिक्त काही पुस्तके असतील, तर ती वाईट नाहीत; पण त्यांची सक्ती नको.
-जयप्रकाश जोशी, निवृत्त पर्यवेक्षक, जि. प. कन्या प्रशाला
आम्ही भरडलो जातोय
४शाळा दरवर्षी काहीतरी नवीन काढून पैसे उकळतात. यात आम्ही भरडलो जातोय, पण जेवढी मोठी शाळा तेवढी अधिक लूट केली जात आहे. त्या तुलनेत गुणवत्ता दिसत नाही.
-एक पालक
दहा शाळांच्या दहा तर्हा
एकीकडे खासगी शाळा भरमसाठ लूट करत आहेत, तर दुसरीकडे शारदा मंदिर शाळा तसेच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पुस्तकांसाठी खूप कमी खर्च येतो.
1. भास्कराचार्य इंग्लिश स्कूल
पुस्तके व वर्कशीटची संख्या 20
मूल्य रुपये 2104
वह्या व स्टेशनरी मूल्य रुपये 1430
एकूण रुपये 3534
2. देवगिरी ग्लोबल अकॅडमी
पुस्तके व वर्कशीटची संख्या 13
मूल्य रुपये 1965
वह्या व स्टेशनरी मूल्य रुपये 555
एकूण रुपये 2520
3. नरेंद्र विद्यामंदिर इंग्रजी माध्यम
पुस्तके व वर्कशीटची संख्या 15
मूल्य रुपये 1350
वह्या व स्टेशनरी मूल्य रुपये 1156
एकूण रुपये 2506
4. अगस्ती सेमी इंग्रजी माध्यम
पुस्तके व वर्कशीटची संख्या 21
मूल्य रुपये 619
वह्या व स्टेशनरी मूल्य रुपये 777
एकूण रुपये 1396
5-एम. यू. इंटरनॅशनल स्कूल
पुस्तके व वर्कशीटची संख्या 18
मूल्य रुपये 3024
वह्या व स्टेशनरी मूल्य रुपये 1444
एकूण रुपये 4468
6. स्वामी विवेकानंद अकॅडमी
पुस्तके व वर्कशीटची संख्या 09
मूल्य रुपये 102
वह्या व स्टेशनरी मूल्य रुपये 767
एकूण रुपये 869
7. एसबीओए
पुस्तके व वर्कशीटची संख्या 10
मूल्य रुपये 570
वह्या व स्टेशनरी मूल्य रुपये 619
एकूण रुपये 1189
8. सेंट जॉन इंग्लिश स्कूल
पुस्तके व वर्कशीटची संख्या 23
मूल्य रुपये 975
वह्या व स्टेशनरी मूल्य रुपये 974
एकूण रुपये 1949
9. शारदा मंदिर कन्या प्रशाला
पुस्तके व वर्कशीटची संख्या 07
मूल्य रुपये 102 (मोफत वितरण)
वह्या व स्टेशनरी मूल्य रुपये 300 ते 500 (ऐच्छिक)
एकूण रुपये 402 ते 500
10. मनपा प्रियदर्शिनी इंदिरानगर शाळा
पुस्तके व वर्कशीटची संख्या 07
मूल्य- रुपये 102 (मोफत वितरण)
वह्या व स्टेशनरी मूल्य 300 ते 500 (ऐच्छिक)
एकूण रुपये 400 ते 500
(फोटोः दुकानावर पालकांची शालेय सामानासाठी गर्दी - अरुण तळेकर)