आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education Department Give Mass Cheating Facility Heramb Kulkarni

शिक्षण विभागाकडूनच कॉपीची व्यवस्था; नियोजनावर प्रश्नचिन्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी पायाभूत चाचणी घेण्यात येत आहे, परंतु काही शहरातील शाळांना गणेशोत्सवाच्या दहा दिवस सुट्या आहेत. उर्वरित महाराष्ट्रात १४ ते ३० सप्टेंबर यादरम्यान कधीही पायाभूत चाचणी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एकाच वेळी होणाऱ्या या चाचणीचा विचित्र परिणाम होणार असून यामुळे अधिकृतरीत्या मास कॉपीचीच व्यवस्था करण्यात आली आहे, असा आरोप शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.

आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करायचे नाही, या निर्णयामुळे चार-पाच वर्षांपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात नाही. परंतु यामुळे प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता ढासळत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले होते. तसेच शिक्षक आणि संस्थांकडूनही परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर या वर्षीपासून दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी सुरू करण्यात आली होती.

उपाययोजनाहवी : राज्यभरातएकाच वेळी १४ ते ३० सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांची तयारी करून घेत शाळांनी ही चाचणी घ्यायची आहे. मात्र मुंबई, कोकणासह अन्य काही भागांत गणेशोत्सवाची सुटी आहे. त्यातच प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे पायाभूत चाचणीच्या एकूणच नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

१४ ते ३० सप्टेंबरदरम्यान कधीही पायाभूत चाचणी घेण्याची सूट देत विद्यार्थ्यांना आधीच प्रश्नपत्रिका दिल्या आहेत, एवढी मोकळीक कशासाठी असा प्रश्न कुलकर्णी यांनी केला आहे.
राज्यभरात मागेपुढे चाचणी होणार आहे. मग बाह्य मूल्यमापन कसे होणार? सुटी द्यावयाची असल्याने प्रश्नपत्रिकाही गणेशोत्सव संपल्यावरच वाटायला हव्या होत्या. पण त्या वाटून १५ दिवसांत कधीही चाचणी घ्या, इतके स्वातंत्र्य का दिले? प्रश्नपत्रिकांचा गैरवापर होईल ही साधी बाबही नियोजनात लक्षात आली नाही का, असा सवालही हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे. या प्रकारांमुळे चांगला उपक्रम प्रभावहीन होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.