आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण विभागातील अधिकारी माफिया असल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यात ४८ इंग्रजी माध्यमाच्या शाळा चौकशीत अनधिकृत दिसून आल्या होत्या. त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल करताना गटशिक्षणाधिकारी शिक्षण माफिया असून शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकारी शिक्षणाचा बाजार करत असल्याचा आरोप जि. प. सदस्य दीपक राजपूत यांनी बैठकीत केला.

सोमवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. बैठकीत सुरुवातीपासूनच शिक्षण विभागाला अग्रभागी ठेवून चर्चा करण्यास सुरुवात झाली. राजपूत यांनी अनधिकृत शाळांवर कोणती कारवाई केली, याचा खुलासा सदस्यांनी विचारला. त्यावर शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात ४८ शाळा अनधिकृत आढळल्या. त्यांना नोटीस पाठवून खुलासा मागवला असून १२ शाळांनी खुलासा पाठवला. त्यात त्यांनी, आमच्याकडे केवळ बालवाडीचा वर्ग चालत असल्याने आमची शाळा अनधिकृत नसल्याचा खुलासा केल्याचे उपासनी म्हणाले. त्यावर आपल्या पथकाने कशाच्या आधारे चौकशी अहवाल तयार केला, आपल्याला कळले नाही का कोणते वर्ग चालतात ते, असा प्रश्न सदस्यांनी विचारला. त्यावर बोर्ड बघून अहवाल तयार केल्याचे उपासनी यांनी सांगितले. त्यामुळे सदस्यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, अधिकाऱ्यांनी शाळांकडून सात ते आठ हजार रुपये घेतले,अधिकारी शाळांकडून हप्ते घेतात. शिक्षण विभागातील अधिकारी शिक्षण माफिया असून त्यांच्यामुळेच शिक्षणाचे बाजारीकरण होत असल्याचा आरोपही राजपूत यांनी केला. त्यानंतर शिक्षण विभागाकडे केवळ बालवाडीचे वर्ग असल्याचा खुलासा आला असून मी पुढील बैठकीत वरिष्ठ वर्गाच्या त्या शाळांचे दाखले आणून दाखवतो, असे आव्हान स्थायी समिती सदस्य ज्ञानेश्वर मोटे यांनी दिले.

बैठकीस कन्नड, सिल्लोड, पैठण आणि गंगापूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपले प्रतिनिधी पाठविले होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संतापून या चारही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश दिले. यापुढे कुणीही प्रतिनिधी पाठवू नये, असे आदेशही दिले. प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी राजपूत यांनी चार हार आणले होते. मात्र, अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी अधिकाऱ्यांची बाजू घेतल्याने त्यांच्याच गळ्यात वाढदिवसाचे औचित्य म्हणून हे हार घातले.
बातम्या आणखी आहेत...