आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education In Urdu But Exam In Marathi And English Format

शिक्षण उर्दूतून, परीक्षा मात्र मराठी आणि इंग्रजीतून!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दहावी बोर्ड परीक्षेत सर्व माध्यमातून परीक्षा देण्याची सूट असली तरी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आयसीटी ( इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) पेपरचे प्रात्यक्षिक आणि परीक्षा मात्र मराठी अथवा इंग्रजी माध्यमातून द्यावी लागणार असल्याने उर्दू माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या पाच हजार विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. या विद्यार्थ्यांना सोयीचे माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी परीक्षा मंडळाला प्रस्तावही पाठवण्यात आला. मात्र त्यावर कोणताच निर्णय झाला नाही.

दहावी आणि बारावीची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेतून अथवा सोयीच्या माध्यमातून परीक्षा देण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र उर्दू माध्यमातून शिक्षण घेणार्‍या नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून आयसीटी या पेपरची परीक्षा देण्याची सुविधा नाही. या माध्यमातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची जिल्ह्यातील संख्या दोन हजार असून दहावीत तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक सभेत उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यावर शिक्षणाधिकार्‍यांनी माध्यमिक शिक्षण मंडळाला उर्दू माध्यमातून हा पेपर घेण्याची शिफारस केली आहे. पंधरा दिवस होऊन गेले तरी या प्रस्तावावर कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

नववी वर्गापासून आयसीटी विषय
विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी शिक्षण मंडळाने नववीपासूनच आयसीटी हा विषय अनिवार्य केला आहे. दहावीलाही हा विषय आहे. सर्वच शाळांमध्ये हा विषय शिकवला जातो. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उर्दू माध्यमातून हा विषय शिकवला जातो. मात्र त्याचे प्रात्यक्षिक आणि परीक्षा मराठी अथवा इंग्रजी माध्यमातून घेण्यात येत असल्याने या विद्यार्थ्यांची अडचण होत आहे.

तक्रारी प्राप्त होताच बोर्डाकडे प्रस्ताव
उर्दू शिक्षकांच्या तक्रारी येताच बोर्डाकडे तशी शिफारस केली आहे. त्यावर अद्यापपर्यंत निर्णय झाला नाही. तसा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांची सोय होईल. पी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक

उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून परीक्षा देण्याची मुभा आहे. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मात्र मराठी अथवा इंग्रजी माध्यमातून परीक्षा द्यावी लागते. हा उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. युनूस पटेल, अध्यक्ष, मराठवाडा माध्यमिक व माध्यमिक मुख्याध्यापक संघ

विषयाची पुस्तके मराठी अथवा इंग्रजीत हवीत
हा अभ्यासक्रम या वर्षापासून सुरू झाला असून त्याचा अभ्यासक्रम उर्दूमध्ये आहे. परीक्षा आणि प्रात्यक्षिकासाठी मराठी व इंग्रजी माध्यमाचा पर्याय आहे. यात बदल पाहिजे. जमील खान, मुख्याध्यापक, अमानउल्ला हायस्कूल

पूर्ण राज्यात अशीच स्थिती
या पेपरच्या प्रात्यक्षिक व परीक्षेबाबत राज्यभर अशीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. राज्यभरात या अभ्यासक्रमात बदल करण्याची मागणी माध्यमिक शिक्षण संस्थाचालक संघटनेकडून करण्यात येत आहे.