आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना संस्थेचा आग्रह, ना सक्ती; मुलींच्या गुणवत्ता वाढीसाठी सरसावल्या ‘सरस्वती’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ना संस्थेने आग्रह धरला, ना कुठलीही सक्ती केली. तरीदेखील अभ्यासात कच्च्या असलेल्या विद्यार्थिनींची गुणवत्ता वाढवण्यासाठी शारदा मंदिर कन्या प्रशालेतील शिक्षिकांनी पुढाकार घेतला आहे. सरस्वती होत शाळा सुटल्यानंतर या मुलींना एक तास शिकवण्याचा उपक्रम शिक्षिकांनी स्वत:हून हाती घेतला आहे. यासाठी आठ ते दहा शिक्षिकांचा गट तयार करण्यात आला आहे.

इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करू नका, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या प्रकारामुळे पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी चिंतामुक्त झाले आहेत. परंतु हेच विद्यार्थी नववी आणि दहावीच्या वर्गात जातात, तेव्हा मात्र त्यांना अभ्यासात अडचण निर्माण होते. परिणामी दरवर्षी दहावीच्या विद्यार्थिनींची उत्तीर्णतेची टक्केवारी मोठी वाटत असली, तरी नववीतून दहावीत येणार्‍या अनुत्तीर्ण विद्यार्थिनींचे प्रमाणही तेवढेच वाढले आहे. अशा विद्यार्थिनींचे शाळा सुटल्यानंतर शिक्षक एक तास विशेष वर्ग घेत आहेत. यामुळे विद्यार्थिनींच्या मनातील भीती दूर होऊन त्या अधिक गतीने अभ्यास करू लागतील. तसेच शिक्षक आणि विद्यार्थिनींमध्ये अभ्यासाची असणारी भीती दूर होऊन मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे.
अशी तपासली जाते गुणवत्ता
या उपक्रमाचा किती उपयोग होतो हे जाणून घेण्यासाठी एक चाचणी परीक्षा घेतली जाते. त्यातून विद्यार्थिनी स्वत:च गुणवत्तेतील सुधारणेविषयी चर्चा करतात. त्यातून कोणत्या मुद्दय़ांवर अधिक भर द्यायचा आहे, हे स्पष्ट होताच मुलींकडून तयारी करून घेतली जाते.

असा आहे उपक्रम
पहिली ते आठवीच्या वर्गात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची यादी तयार करण्यात आली आहे. नववीतील 40 आणि दहावीत ज्यांना काही विषय अवघड वाटतात अशा 22 विद्यार्थिनींसाठी एक तास जास्तीचे वर्ग घेतले जात आहेत. त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी टिप्स दिल्या जात आहेत.
त्यांच्याकडून रोज सराव करून घेण्यात येत आहे. कोणत्या विषयात अडचण येते याविषयी त्यांचे समुपदेशन केले जात आहे. या उपक्रमासाठी शाळेतील आठ ते दहा शिक्षिका पश्रिम घेत असल्याची माहिती शाळेच्या पर्यवेक्षिका उज्‍जवला निकाळजे-जाधव यांनी दिली.

गुणवत्ता विकास या उपक्रमाचा फायदा होतो आहे. अवघड वाटणारे विषय समजण्यासाठी सोपे वाटत आहेत. यामुळे अभ्यासक्रमातील किचकट प्रश्नही आता मी न घाबरता ते सोडवू शकते. प्रियंका वाघ, विद्यार्थिनी

अशी सुचली कल्पना
उत्तीर्णांचे सर्वत्र कौतुक होते, परंतु अभ्यासाबरोबरच विद्यार्थिनींना सामान्यज्ञान असणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी अवघड वाटतात त्याकडे वेळीच लक्ष दिले, तर विद्यार्थ्यांचा ताण कमी होण्यास मदत होते. मुलींच्या गुणवत्ता वाढीसाठी पालकांनाही मार्गदश्रन करण्यात येत आहे. प्रतिभा काकडे, उपमुख्याध्यापिका