आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education News In Marathi, Student, Syllabus, Divya Marathi, Aurangabad

केजी टू पीजी: शिक्षकांनो... वाचाल तर शिकवाल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यार्थी स्पर्धेत टिकावा म्हणून अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल केले जातात; परंतु शैक्षणिक धडे देणा-या शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करता यावे म्हणून शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ‘ग्रंथसूची’ उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून विविध उपक्रम राबवताना शिक्षक मात्र वाचनावर भर देत नसल्याचे समोर आले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर पडत असून शिक्षकांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून सरकार पातळीवर हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येईल. शिक्षकांनी नवनवीन पुस्तके वाचून त्याचा उपयोग अध्यापनासाठी करावा हादेखील या उपक्रमामागील उद्देश आहे.
शिक्षकांमध्ये वाचनाचा अभाव असल्याने विद्यार्थ्यांना अत्याधुनिक ज्ञान मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थीदेखील परीक्षेपुरती घोकंपट्टी करताना दिसून येतात. म्हणूनच प्रथम शिक्षकाने वाचावे आणि विद्यार्थ्यांमध्येही ही वाचनसंस्कृती रुजवावी यासाठी गुरुजींसाठी ग्रंथसूची हा उपक्रम आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी ‘वाचन चावडी’ हा उपक्रम घेण्यात आला होता.

असा असेल उपक्रम
‘ग्रंथसूची’अंतर्गत शाळेच्या ग्रंथालयासाठी दरवर्षी सर्व शिक्षा अभियानांतर्गत सात ते आठ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी दिले जात आहेत. शिक्षकांना टाचणवहीबरोबर वाचलेल्या पुस्तकाचेदेखील टाचण काढायचे आहे. जे पुस्तक वाचले त्याचा अध्यापनात विद्यार्थ्यांना शिकवताना काय फायदा होतो याविषयीची सहकारी शिक्षकांबरोबर मुख्याध्यापकांसमक्ष दर शनिवारी चर्चा करायची आहे. मुख्याध्यापकांना शिक्षण विभागास वेळोवेळी उपक्रमाचा अहवाल पाठवणे बंधनकारक राहणार आहे.
सर्व शाळांना अनिवार्य
शिक्षक वाचत नसल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता मागे पडत आहे. त्यामुळे शिक्षकांनीदेखील बदलत्या काळात स्वत:मध्ये बदल घडवावेत म्हणून हा उपक्रम राबवला जाणार आहे. सर्व शाळांना हा उपक्रम नियमितपणे राबवणे अनिवार्य आहे.
सुधाकर बनाटे, शिक्षण उपसंचालक.