आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अपात्र ठरवलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात येत्या तीन दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असा दिलासा शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी विद्यार्थी आणि पालकांना दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी संसदेचे उद्घाटन गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे आणि शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. कार्यक्रम संपल्यानंतर काही पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन बारावीच्या विद्यार्थ्यांवर परीक्षेचे आलेले गंडांतर याविषयी विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केली. दहावीत 40 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या 903 विद्यार्थ्यांना शहरातील काही महाविद्यालयांनी बोर्डाचा नियम डावलून विज्ञान शाखेत प्रवेश दिले. चार दिवसांपूर्वी बोर्डाने या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास अपात्र ठरवले आहे. परीक्षा तोंडावर आली असून बोर्डाने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून काही विद्यार्थी संघटनांनी आंदोलनही केले.
फौजिया खान म्हणाल्या, परीक्षा तोंडावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. दोन ते तीन दिवसांत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. ज्या महाविद्यालयांनी नियम मोडले अशांविरुद्ध चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सर्वानुमते सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
अनेक महाविद्यालयांनी यासंदर्भात पालकांना आंधारात ठेवले आहे. बोर्डाने आपल्या मुलास कशामुळे अपात्र ठरवले याबाबत काहीच कळवले नाही. बोर्डाच्या नियमाची पायमल्ली आणि विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला बांधणार्यांमध्ये शहरातील नामांकित शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.