आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्त प्रसिद्ध होताच थकीत शैक्षणिक कर्जाचे पैसे मिळाले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या शैक्षणिक कर्जाची रक्कम मिळवताना एका गुणवंत विद्यार्थिनीची सुरू असलेली दमछाक अखेर संपुष्टात आली. या रकमेसाठी तिने महामंडळाच्या स्थानिक कार्यालयापासून मुंबईपर्यंत पाठपुरावा केला, पण हाती खोट्या आश्वासनांशिवाय काहीच लागले नाही. यामुळे तिचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे. मात्र, डीबी स्टारने याबाबत वृत्त देताच सूत्रे हलली आणि या विद्यार्थिनीला मंजूर रकमेचा धनादेश मिळाला.

एमजीएम आरोग्य विज्ञान विद्यापीठात बीएस्सी मेडिकल ऑप्टिमेट्री टेक्नॉलॉजीच्या अंतिम वर्षात शिकत असणार्‍या शेख आदिबा शाहीन शेख सलिमोद्दीन हिने या कर्जासाठी अर्ज केला होता. या अभ्यासक्रमासाठी 41.5 हजार रुपये शुल्क आहे. 5 जानेवारी 2012 रोजी तिला कर्ज मंजूर झाल्याचे पत्र मिळाले, तर 1 नोव्हेंबर 2012 रोजी तिला सुधारित मंजुरीपत्र पाठवण्यात आले. प्रत्यक्षात 2013 उजाडले तरी कर्जाची रक्कम हातात आली नव्हती. तिच्यासोबत प्रस्ताव दाखल केलेल्या अनेक जणांना धनादेश मिळाले. या रकमेसाठी तिने 4 ते 5 वेळेस महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक इब्राहिम पठाण यांची भेट घेतली, तर अनेकदा मुंबई कार्यालयाशी पत्रव्यवहार केला; परंतु उपयोग झाला नाही. यामुळे तिचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले होते. आदिबा हिचे वडील शेख सलिमोद्दीन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कर्मचारी आहेत. त्यांना 3 मुलीच असून एक विवाहित, दुसरी डीएड, तर तिसरी बीएस्सी ऑप्टिमेट्री करतेय. मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि चरितार्थ चालवताना त्यांची दमछाक होतेय. डीबी स्टारने 21 नोव्हेंबर रोजी आदिबा हिच्या व्यथेला ‘कागदावर मंजुरी, पण प्रत्यक्षात टाळाटाळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून वाचा फोडली.

योगायोगाने त्याच दिवशी इब्राहिम पठाण महामंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत होते. डीबी स्टार प्रतिनिधीने त्यांना हे वृत्त आणि आदिबा हिचे मंजुरीपत्र पाठवले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अइनुल अत्तार यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेत लगेच धनादेश जारी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्याच दिवशी आदिबा हिच्या नावाचा 26 हजार रुपयांच्या कर्जाच्या पहिल्या हप्त्याचा धनादेश काढण्यात आला. लवकरच उर्वरित रक्कम अदा केली जाईल, असेही तिला सांगण्यात आले. पठाण यांनी 16 जानेवारी रोजी हा धनोदश आदिबा हिला सुपूर्द केला.

डीबी स्टारमुळे काम झाले
या अभ्यासक्रमाची फी आम्हाला परवडणारी नव्हती. आझाद महामंडळाचे कर्ज मिळेल, अशी अपेक्षा होती; पण कर्ज मंजूर होऊनही पैसे नाही मिळाले. माझा प्रवेश रद्द होण्याचा धोका निर्माण झाला होता. डीबी स्टारने वृत्त प्रकाशित करताच माझे काम झाले.
शेख आदिबा शाहीन शेख सलिमोद्दीन, विद्यार्थिनी

शैक्षणिक नुकसान टळले
महामंडळाने कर्ज मंजूर केल्याचे संमतीपत्र आम्हाला दोनदा दिले, पण प्रत्यक्षात कर्ज देताना टाळाटाळ सुरू होती. डीबी स्टारने हा विषय उचलून धरल्यामुळे माझ्या मुलीचे शैक्षणिक नुकसान टळले. यासाठी संपूर्ण चमूचे मन:पूर्वक धन्यवाद.
शेख सलिमोद्दीन, विद्यार्थिनीचे वडील