आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयशरवर स्कॉर्पिओ आदळून तीन ठार; औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आळंद- औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावर उभ्या असलेल्या मालवाहू आयशरवर स्कॉर्पिओ आदळून झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओमधील तीन जण जागीच ठार झाल्याची भीषण घटना औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गावरील केऱ्हाळा फाटा येथे रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली.

वडोदबाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून सिल्लोडच्या दिशेने जाणारा मालवाहू आयशर (क्रमांक.एम.एच.२१.९०८७)हा पहाटे साडेतीनच्या सुमारास केऱ्हाळा फाटा येथे रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी पाठीमागून येणारी स्कॉर्पिओ कार (क्रमांक. एम. एच. १२. ई. एम. ५२२५) उभ्या आयशरवर आदळली. या भीषण अपघातात कारमधील विनोद रामदास इंगळे (४०) रा. जामठी ता.सोयगाव, प्रसाद अशोक जांभळे.(२१)रा. वाघोली, ता.हवेली, जि. पुणे भूषण रामचंद्र मोरे (२१)रा. धुळे हे तिघे जागीच ठार झाले. अपघात होताच आयशर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. अपघात इतका भीषण होता की, या अपघातात कारचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघात होताच वडोदबाजार पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अपघातातील मृतांना सिल्लोड येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

अंमलदार एस. व्ही. सनवे यांच्या फिर्यादीवरून वाहतुकीच्या मार्गावर निष्काळजीपणे आयशर उभा करून तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात आयशरचालकाविरुद्ध वडोदबाजार ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एस. एस. दौड, एन. मेटे, दिलीप साळवे तपास करीत आहेत.

रस्त्याच्या मध्यभागी पांढरे पट्टे नसल्याने अपघात
गेल्याकाही वर्षांपासून चाळणी झालेल्या औरंगाबाद-जळगाव राज्य महामार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने चार महिन्यांपूर्वी दुरुस्ती केल्याने वाहनधारकांची खड्ड्यातून मुक्तता झाली. मात्र, महामार्ग दुरुस्त होऊन चार महिने झाले तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मध्यभागी असलेले पांढरे पट्टे (व्हाइट बॉर्डर)अद्यापही मारल्याने रात्रीच्या वेळेस वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात झाले असून अनेक प्रवासी वाहनधारकांचे बळी जात आहेत.
बातम्या आणखी आहेत...