आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eid e miladunnabine Urusa Concluded In Khulatabada

सात लाख भाविकांनी घेतले महंमद पैगंबरांच्या पोशाखाचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त येथील महंमद पैगंबर यांच्या पोशाखाचे व मिशीच्या केसाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी राज्यभरातून भाविकांनी बावीस ख्वाजा यांच्या दर्ग्यामध्ये गर्दी केली. दर्शनासाठी सकाळी चारपासून भाविकांच्या रांगा लागल्या. वर्षातून एकदाच या दिवशी हा पोशाख व मिशीचे केस भाविकांना दर्शनासाठी खुले असतात. रविवारी सुमारे सात लाख भाविकांनी दर्शन घेतले. गर्दीमुळे दौलताबाद घाटात दुपारी सुमारे पाच तास वाहतूक ठप्प झाली होती. फुलंब्री व वेरूळकडून येणा-या वाहनांनादेखील शहराबाहेर रोखण्यात आले होते.

भाविकांच्या सकाळपासून रांगा
खुलताबाद येथील जरजरी जरबक्ष यांच्या ७२८ व्या उरुसास २८ डिसेंबरपासून प्रारंभ झाला. रविवारी ईद-ए-मिलादुन्नबीने उरुसाची सांगता झाली. सकाळी पाच वाजता बाबा बुऱ्हानोद्दीन दर्ग्यामध्ये महंमद पैगंबर यांच्या मिशीचे केस व पोशाख काचेच्या पेटीत दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळच्या नमाजनंतर दर्शनास प्रारंभ झाला. दर्शनासाठी दर्ग्यापासून ते शूलिभंजन फाट्यापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
दर्शनासाठी भाविकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. परिसरात खुलताबाद पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. ठिकठिकाणी भाविकांच्या सेवेसाठी अनेकांनी परिश्रम घेत मोफत पाणी व प्रसादाचे वाटप केले. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता.