आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eight Class Will Close Of Aurangabad Municipal Corporation School

विद्यार्थी मिळूनही आठवीचा वर्ग बंद पडण्याची वेळ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात विद्यार्थी मिळत नाहीत म्हणून मनपाच्या अनेक शाळा बंद पडण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात विद्यार्थी असूनही केवळ जि. प. च्या उदासीन धोरणामुळे वर्ग बंद पडण्याची वेळ आली आहे. सिंदोन येथे शालेय व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन आठवीचा वर्ग सुरू केला आहे. मात्र या वर्गाला मान्यता नसल्याच्या कारणावरून तीन विद्यार्थ्यांनी दाखले काढून नेले.
या शैक्षणिक वर्षापासून सिंदोन (ता. औरंगाबाद) येथील शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला. आरटीईचे सगळे निकष पाळून पंचायत समितीला महिनाभरापूर्वी प्रस्तावही पाठवला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या वर्गाला मान्यता नसल्याचे गृहीत धरून तीन विद्यार्थ्यांनी दाखले काढून घेतले आहेत. त्यामुळे आता २१ विद्यार्थी शिल्लक राहिले आहे. उर्वरित विद्यार्थी टिकवण्यासाठी गावकरी मुख्याध्यापक प्रयत्न करीत आहेत.
साटेलोटे असल्याचा आरोप
खासगी आश्रमशाळा आणि पंचायत समिती स्तरावरील अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत. या वर्गाला अधिकृत मान्यता दिली जात नसल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीने केला आहे.
प्रस्ताव पाठवला
शाळा सुरू करण्यासाठी शाळा, वर्गशिक्षकासह शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव असल्यास नवीन आठवीचा वर्ग सुरू करता येतो. त्यानुसार हा ठराव घेऊन तसेच शाळेचे नियोजन करून प्रस्ताव पंचायत समितीला पाठवला आहे. मात्र त्यावर अद्यापही काही निर्णय नाही.
का गरज होती ?
सिंदोनपासून चार किमीवरील शिवगड तांडा आश्रमशाळेत २५ विद्यार्थी दरवर्षी आठवीचे शिक्षण घेण्यासाठी पायी येणे-जाणे करत होते. पाणी पाऊस, ऊन, थंडीत हे अंतर पार करीत होते. मात्र आरटीईच्या नियमानुसार गावातच आठवीचा वर्ग सुरू करणे शक्य असल्याने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा वर्ग सुरू करण्यात आला.
स्थानिक संस्थेला अधिकार
- ठराव घेऊन स्थानिक संस्थेला वर्ग सुरू करण्याचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा हा विषय आहे. याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगून तत्काळ निर्णय घेतो.
नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी, जि. प.
स्वखर्चाने तयारी
- गावकऱ्यांनी नवीन वर्गासाठी २० हजार रुपये खर्च केले. विद्यार्थ्यांसाठी मी स्वत: काही प्रमाणात खर्च करून पुस्तके दिली. प्रशासनाने मान्यता देऊन काही पुस्तके द्यावीत.
राजेंद्र वाघमारे, मुख्याध्यापक, सिंदोन शाळा.
विद्यार्थ्यांचा त्रास वाचेल
- विद्यार्थ्यांचा त्रास वाचण्यासाठी गावातच वर्ग सुरू केला. मात्र संस्थाचालक पंचायत समिती अधिकाऱ्यांचे साटेलोट असल्याने प्रस्तावावर कारवाई करण्यात आली नाही.
काकासाहेब शिंदे, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती