आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठ शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न; बोंडअळीने त्रस्त, जिल्हा कृषी कार्यालयावर मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने हताश झालेल्या गंगापूर तालुक्यातील सात ते आठ शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. कृषी अधिकारी, पोलिसांच्या प्रयत्नामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. 


यंदाच्या खरीप हंगामात ७५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. मात्र, गुलाबी बोंडअळीपुढे बीटी बियाण्याचा टिकाव लागला नाही. त्यातच कंपनीने नॉन बीटी दिले नाही शेतकऱ्यांनी ते लावण्याची तसदी घेतली नाही. परिणामी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रकोप होऊन बोंडेच उद्ध्वस्त झाली. यास शासन, कृषी विभाग अशी मागणी करत गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथील शेतकऱ्यांनी जि. प. चे माजी सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली बोंडअळी कपाशीची झाडे, गुलाबी अळीने बाधित झालेल्या कैऱ्यांसह शहानूरवाडी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर दुपारी साडेबारा वाजता मोर्चा आणला. 


आत्मदहन करण्यासाठी सहा बाटल्या रॉकेलही सोबत होते. कार्यालयाच्या गेटवर कैऱ्यांचा हार अर्पण करून शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या दालनाकडे माेर्चा वळवला. कृषी अधीक्षक संजीव पडवळ यांच्या दालनात बोंडअळीवरच महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. तेथे शेतकऱ्यांनी प्रवेश करत फलोत्पादन विभागाचे संचालक पी. एन. पोकळे, कृषी सहसंचालक, कृषी अधिकाऱ्यांना बोंडअळीबद्दल जाब विचारला. 


अधिकाऱ्यांच्या उत्तराने समाधान झाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला सात ते आठ जणांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. तेव्हा अधिकाऱ्यांच्या अंगावरही रॉकेल पडले. पोलिस कृषी अधिकाऱ्यांनी तत्काळ रॉकेलच्या बॉटल ताब्यात घेत शेतकऱ्यांची समजूत काढली. पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. या वेळी पोपटराव चव्हाण, विठ्ठलराव चव्हाण, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर तिवारे, अप्पा जगदाळे, नाना सुंभ, गोकनाथ चव्हाण, संजय पेंटर, संतोष चव्हाण, पी. पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. 


कपडे बदलून घेतली बैठक
कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर रॉकेल उडाले होते. दालनात सर्वत्र रॉकेल सांडल्याने उग्र वास येत होता. या सर्व प्रकारामुळे कृषी अधिकारी घाबरून गेले होते. शेतकऱ्यांना शांत केल्यानंतर अधिकाऱ्यांनी कपडे बदलून बैठक घेतली. 


गुलाबी बोंडअळीचाप्रादुर्भाव रोखणारे कपाशी बियाणे शेतकऱ्यांना दिले गेले नाही. त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. एकरी पंधरा क्विंटलऐवजी फक्त तीन क्विंटल उत्पादन हाती आले. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये भरपाई मिळावी. 
- संतोष जाधव, माजी सभापती, जि. प. 


पंचनामे सुरू 
बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी पंचनामा करत आहेत. शेतकऱ्यांनी संयम ठेवावा. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याची नोंद घेतली जाणार आहे. 
- संजीव पडवळ, जिल्हा अधीक्षक कृषी 

बातम्या आणखी आहेत...