आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - बीएसजीएम शाळेत आठवीत शिकणा-या निकिता राजेंद्र क्षीरसागर या धाडसी मुलीने पाठलाग करत चोर तरुणीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. चोरट्या तरुणीशी झटापट सुरू असताना कामगार चौकात जमाव जमला, पण निकिताच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. तिने मात्र माघार घेतली नाही. रविवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली.
उद्योजक त्र्यंबक शिरसाट यांच्या सिडको एन-4, जी सेक्टरमधील बंगल्याचे नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे बंगला बंद असून, शिरसाट जवळच एका घरात राहत आहेत. रविवारी दुपारी 45 वर्षीय महिला व 17 वर्षांची तरुणी मागील बाजूने बंगल्यात शिरल्या. चॅनल गेटचे कुलूप त्यांनी तोडले. 15 मिनिटांत ऐवज गोळा करून त्या बाहेरही पडल्या. बंगल्यासमोर राहणा-या रोहिणी क्षीरसागर यांनी हा प्रकार बघितला. संशय आल्याने त्यांनी आपली 13 वर्षीय मुलगी निकिताला ‘काय प्रकार आहे ते पाहून ये’, असे सांगितले. बंगल्यात पोहोचताच चोरी झाल्याचे निकिताच्या लक्षात आले. धाडसाने तिने या चोरट्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. शिरसाट यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचे मणी, गॅसचे रेग्युलेटर, नळ, 2 मोबाइल, असा 6.5 हजारांचा ऐवज चोरला होता.
झटापटीत चोरट्या मुलींनी चावा घेतला : तेरा वर्षांच्या निकिताने सायकलीवरून चोर महिला व मुलीचा पाठलाग केला. कामगार चौकात त्यांना पकडले. दोघींनी तिच्यावर हल्ला केला. तिच्या हाताला कडकडून चावे घेतले. निकिताने पकड कायम ठेवली.
गर्दी जमली, पण सगळे ‘बघे’च : निकिताची चोरट्यांशी झटापट सुरू असताना जमाव जमला, पण सारे बघेच होते. दहा मिनिटांनी निकिताचे वडील व मुकुंदवाडी पोलिस आले. त्यांच्याभोवती जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोर महिला पसार झाली.
निकिताचा सत्कार करणार - पाठलाग करून चोर पकडणे हे धाडसाचे काम आहे. शाळकरी मुलीने ते करणे कौतुकास्पद आहे. आम्ही निकिताचा सत्कार करणार आहोत. चोर महिला व मुलगी सराईत गुन्हेगार असल्याचे ऐकून मी अवाक् झालो.’ - अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त
निकिताचा अभिमान वाटतो - एकीकडे मोठी माणसे जबाबदारी विसरत असताना निकिताने दाखवलेले धाडस आनंददायक आहे. तिचा अभिमान वाटतो.’ - त्र्यंबक शिरसाट, उद्योजक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.