आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eknath Khadse Took Hospitality In Municipal Commissioner Home

महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी घेतला आयुक्त महाजनांच्या घरी पाहुणचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रकाश महाजन यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवून त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली भाजपच्या वतीने सुरू होत्या. राज्याच्या सत्तेत असलेल्या मोठ्या नेत्यांनी आयुक्तांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यास विरोध केल्याने सर्व पदाधिकारी नरमले. त्यातच तीन दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या पदाधिकारी, आमदारांच्या घराऐवजी डॉ. महाजन यांच्या घरी पाहुणचार घेणे पसंत केल्याने डॉ. महाजन यांना खडसेंचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. महाजनांच्या सेवानिवृत्तीला चार महिने बाकी असून ते याच मनपातून निवृत्त होतील, अशीही चर्चा रंगत आहे.

"स्मार्ट सिटी'संदर्भात ३५ दिवसांवर पीएमसीचे सादरीकरण केले जाणार आहे; पण पीएमसी फायनल करण्यात आली नव्हती. एकाच वेळी शहर अभियंता सखाराम पानझडे आणि महाजन यांच्याकडून त्यांच्या पसंतीच्या पीएमसीला काम देण्याबाबत रस्सीखेच सुरू होती. शेवटी महाजन यांनीच वजन वापरून त्यांच्या सोयीच्या फोर्ट्रेस कंपनीला हे काम दिले. मात्र, पीएमसीचे काम अजूनही सुरू झाले नाही. ५० कोटी रुपये उभारण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. शहरातील रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेजच्या अडचणी असून या सुविधांबाबत शहरात एकच ओरड सुरू आहे. त्यासाठी मनपा प्रशासनानेही कोणतीच पावले उचलली नाहीत. तसेच स्मार्ट सिटीसाठी आवश्यक असलेल्या सिटी बसबाबतही कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे केवळ उरलेले दिवस समाधानाने घालवून डॉ. महाजन शहरातूनच निवृत्ती घेतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रोटोकॉल नव्हे, मैत्रीमुळे कार्यक्रमाला हजेरी
गुरुवारीशहरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा सोहळा पार पडला. या वेळी एकनाथ खडसेही आले होते. कार्यक्रमाला मनपा आयुक्त डॉ. प्रकाश महाजन यांचीही उपस्थिती होती. प्रोटोकॉल म्हणून नव्हे, तर मैत्री असल्याने आयुक्त महाजन कार्यक्रमाला आले होते. तसेच खडसेंचा रात्रीचा पाहुणचार पक्षाचे पदाधिकारी किंवा आमदार, नगरसेवकाकडे नव्हे, तर महाजन यांच्या घरी करण्यात आल्याचे समजते.