आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथांच्या पालखीचे प्रस्थान, एकनाथ-भानुदासच्या जयघोषाने पैठण शहर दुमदुमले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठणनगरीतून मानाच्या नाथ महाराजांच्या पालखीचे बुधवारी सूर्यास्तावेळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या वेळी मोठ्या संख्येने वारकरी व भक्तांची उपस्थिती होती.        छाया : बाळू आहेर - Divya Marathi
पैठणनगरीतून मानाच्या नाथ महाराजांच्या पालखीचे बुधवारी सूर्यास्तावेळी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या वेळी मोठ्या संख्येने वारकरी व भक्तांची उपस्थिती होती. छाया : बाळू आहेर
पैठण - येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे बुधवारी (८ जुलै) सूर्यास्तासमयी पंढरपूरकडे एकनाथ-भानुदासच्या जयघोषात प्रस्थान झाले. या वेळी भाविकांनी दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती.

"माझे जिवाची आवडी, पंढरपुरा नेईल गुढी' या अभंगाप्रमाणे मराठवाड्याच्या कानाकोप-यातून या पालखीत सहभागी होण्यासाठी हजारो वारकरी सकाळपासूनच पैठणनगरीत दाखल झाले होते. दिवसभर पैठण शहरात टाळ-मृदंगाच्या गजरात एकनाथ-भानुदास नामाचा गजर सुरू होता. त्यामुळे संपूर्ण शहर भक्तीमय झाल्याचे पाहावयास मिळत होते.

यंदा पालखी निघतेवेळी नाथवंशजाचा वंशवादाचा कोणताही मुद्दा न काढता रघुनाथ बुवा पालखीवाले यांनी दुपारी नाथवाड्यातून पालखी नाथ समाधी मंदिरात आणली त्यानंतर ही पालखी गागाभट चौकातील पालखी ओट्यावर आणण्यात आली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. या पालखीत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीडसह इतर भागांतील वारकरी सहभागी झाले होते. पालखीचा प्रस्थान सोहळा पहाण्यासाठी हजारो भक्त पैठणनगरीत दाखल झाले होते. तीन तासांहून अधिक वेळ हा देखणा सोहळा पालखी ओट्यावर पाहण्यासाठी नगर परिषदेने यंदा प्रथमच स्क्रीनची सुविधा केल्याने पालखी प्रस्थान सोहळ्याला अाधुनिकतेची जोड मिळाली. तसेच सर्वांना सोहळ्याचा आनंद घेता आला.

दहा हजारांच्या वर वारकरी दिंडीत
पैठण येथून निघणा-या संत एकनाथांच्या या पालखी दिंडीत यंदा दहा हजारांच्या वर वारकरी सहभागी झाले असून ११ दिवसांचा मुक्काम करत १९ दिवसांत ही पालखी पंढरपूरला पोहोचेल.

पाच जिल्ह्यांतून पालखी
औरंगाबाद, बीड, सोलापूर, नगर या भागातील चनकवाडी, हदगाव, लाडजळगाव, मुंगसवाडी, राक्षसभुवन रायमोहा, पाटोदा, दिघोळ, खेर्डा, दांडेगाव, परंडा या भागातून प्रवास होतो. गारमाथाच्या डोंगराचा कठीण प्रवास पालखीचा होतो. त्यानंतर २७ जुलैला पंढरपूरला नगर प्रदक्षिणा करण्यात येते.

या ठिकाणी रिंगण सोहळा
रिंगण सोहळा हा भाविकांसह वारक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ज्या गावात रिंगण होते त्या गावासाठी रिंगण म्हणजे विठ्ठलच आपल्या घरी आल्याची भावना असते. संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचे पाच रिंगण होतात ते मिडगाव, पारगाव, घुमरे नागरडोह, कव्हेंदंड, तर पंढरपूरला उभे रिंगण होते.

पालखीच्या दर्शनासाठी गर्दी : माजी आमदार संजय वाघचौरे, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, रेखा कुलकर्णी, संतोष गव्हाणेे आदींनी दर्शन घेतले.