आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - भक्तिरसात चिंब झालेले वारकरी.. सोबतीला टाळ-मृदंगाचा गजर.. डौलाने फडकणार्‍या भगव्या पताका अन् मुखी विठुनाम... अशा चैतन्यमय वातावरणात संतश्रेष्ठ संत एकनाथ महाराजांच्या पालखीने शनिवारी संध्याकाळी सात वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
‘...माझे जीवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी,’ या अभंगाच्या ओवीप्रमाणे हजारो वारकरी नाथ महाराजांच्या दिंडीत सहभागी झाले आहेत. यंदा नाथवंशज व दत्तकपुत्र यांच्या वादामुळे वारकरी-भक्त संभ्रमात दिसले. मात्र ‘आम्ही नाथभक्त चाललो विठ्ठलचरणी,’ म्हणत गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाविक यंदा वारीत सामील झाल्याचे दिसून आले. अनेक वारकरी शुक्रवारपासूनच पैठणनगरीत दाखल झाले होते. नाथ पालखीचा देखणा सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी हजारो भक्तांनी रांगा लावल्या होत्या. संध्याकाळी 5 वाजेपासूनच वारीच्या वाटेवर नाथांची पालखी ठेवण्यात आली होती.
दरम्यान, नाथवंशजांच्या वादावरून यंदा पहिल्यांदाच पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. मात्र कोणताही वाद न होता सोहळा उत्साहात पार पडला.
वादाचे आम्हाला काय ?
आम्ही वारकरी. ज्या ठिकाणी नाथ पादुका, पालखी असेल त्या दिंडीमध्येच सहभागी होऊ. आम्हाला नाथवंशजांच्या वादाशी काय करायचे, असा प्रश्न वारकरी
शारदा जगताप यांनी केला.