आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीचा पाऊस राज्यातील दुष्काळ हटवणार; अल निनोचा प्रभाव ओसरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तळ गाठलेल्या विहिरी, कोरडी पडलेली धरणे, सर्व आशा सोडलेली मानसिकता असे चित्र राज्यभर असतानाच पूर्वा नक्षत्रातील पावसाने सर्वांनाच दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे पर्जन्यछायेत येणाऱ्या अवर्षणप्रवण भागात मागील आठवड्यापासून सूरु झालेल्या जोरदार पावसाने दुष्काळाची धग काही अंशी कमी केली आहे. आगामी काळात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. या काळाच राज्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज हवामान खात्यासह हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

या संदर्भात राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी हवामान शास्त्र प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले, परतीच्या पावसाबाबत खूपच आशादायी अंदाज आहेत. एक तर अल निनोचा प्रभाव बऱ्याच अंशी ओसरला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्यास अनुकूल स्थिती आहे. त्याचा लाभ महाराष्ट्राच्या सर्व भागासह तेलंगणा, उत्तर कर्नाटकाला होणार आहे. परतीच्या काळात मान्सूनचे वितरण काहीसे समान राहील. तास दोन तास जोरदार पाऊस मग एखाद्या तासाची उघडीप, नंतर पुन्हा जोरदार पाऊस असे चित्र राहील. राज्यातील ११३ तालुक्यात पावसाची सध्या ५० टक्क्यापेक्षा जास्त तूट आहे. ती परतीच्या पावसाने भरून निघेल. सर्व छोटी-मोठी धरणे भरण्यास हा पाऊस उपयोगी राहील.
अल निनो निष्प्रभ
मान्सूनच्या वितरणातील सर्वात मोठा अडथळा असलेला अल निनोचा प्रभाव आता ओसरला आहे. त्यामुळे परतीचा पाऊस चांगला राहील. पुणे वेधशाळेच्या मते, राजस्थान, पंजाबमधून परतीच्या वाटेवर असलेला मान्सूनच्या सीमा कायम आहेत. बंगालच्या उपसागरात पश्चिम- मध्य व वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल.

स्कायमेट : राज्याला लाभ
सध्या बंगालच्या उपसागरात एक सकारात्मक मान्सून सिस्टिम तयार झाली आहे. जुलै-ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये जास्त कमी दाबाचे पट्टे निर्माण होतील जे ओडिशाच्या किनाऱ्यावरून देशात पाऊस पाडतील. त्यातच उत्तरेतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्याने या पट्ट्यांचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रासह तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडूला होईल.
चार महत्त्वाची नक्षत्रे बाकी
मराठवाड्यासह अवर्षणप्रवण भागात हमखास पाऊस देणारी पावसाची उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती ही नक्षत्रे अद्याप बाकी आहेत. पंचांगानुसार व या भागातील ठोकताळ्यांनुसार हस्त आणि स्वाती ही नक्षत्रे रब्बीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. पडेल हस्त तर होईल मस्त आणि पडतील स्वाती तर पिकतील मोती (ज्वारी) अशा म्हणी शेतकऱ्यांत रूढ आहेत.
आयओडीही अनुकूल
मान्सूनच्या कार्यप्रवणतेसाठी आवश्यक असलेला इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सध्या भारतीय उपखंडासाठी अनुकूल आहे. यामुळे विषववृत्तानजीक प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान ३ ते ४ अंशांनी वाढते, परिणामी हिंदी महासागराच्या भागात पाऊस पडण्यास मदत होते.
रब्बी चांगला
- जुलै -ऑगस्टच्या तुलनेत परतीच्या पावसाचे प्रमाण चांगले राहील. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल. रब्बीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने राज्यात रब्बी हंगाम उत्तम राहील.
डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ