आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Campaign In Sankranti Festival Aurangabad

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, निवडणुकीत आम्हालाच मतदान करा !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड - ऐन निवडणूककाळात संक्रांतीचा सण आल्याने उमेदवारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यात 50 टक्के महिला आरक्षण आणि त्याला संक्रांतीची जोड यामुळे उमेदवारांचे चांगले फावले आहे. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देताना उमेदवार मात्र आचारसंहितेचा ससेमिरा चुकवण्यासाठी सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांसाठी 7 फेबु्रवारी रोजी मतदान होऊ घातले आहे. कन्नड तालुक्यातील 9 गट व 18 गणांसाठी होणा-या निवडणुकीसाठी 50 टक्के आरक्षणामुळे या वेळी मोठ्या प्रमाणात महिला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रवेश करणार आहे. तालुक्यातील 9 पैकी 7 जिल्हा परिषद गटांमधून महिला सदस्य जिल्हा परिषदेत पाऊल ठेवणार आहेत, तर पंचायत समितीच्या 18 जागांपैकी 9 ठिकाणी महिला सदस्यांची वर्णी लागणार आहे. जि.प. व पंचायत समिती निवडणुकांसाठी 18 ते 23 जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. या दरम्यान पक्षश्रेष्ठींना आपला संपर्क दांडगा असल्याने व आपणच प्रबळ दावेदार असल्याचे दर्शवण्यासाठी, त्याचप्रमाणे मतदार महिलांनाही संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देऊन खुश करण्याची नामी संधी मिळाली आहे. तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, येणा-या निवडणुकीत आम्हालाच मतदान करा, असा संदेश महिला उमेदवार सध्या हळदी-कुंकू देताना दिसून येत आहेत.
ज्या गटात किंवा गणात पुरुष उमेदवार उभे राहणार आहेत तेथेही अशा उमेदवारांच्या पत्त्नी आपल्या पतिराजांसाठी घरोघरी जाऊन संक्रांतीनिमित्त भेटीगाठी घेत आहेत. ब-याच गावांमध्ये हळदी-कुंकवाचे सोहळे साजरे करून आपण इतरांपेक्षा सरस असल्याचे संदेश पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याची धडपड इच्छुकांकडून केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कन्नड तालुक्यातील नागद गट सर्वसाधारण प्रवर्ग तर पिशोर गट इतर मागास प्रवर्गासाठी सुटला असून उर्वरित करंजखेड, चिंचोली लिंबाजी, नाचनवेल, चिकलठाण, हतनूर, देवगाव, जेहूर या 7 गटांमधून महिलांना संधी मिळणार आहे. या सर्व गटांतून महिला संक्रांतीनिमित्त चालून आलेल्या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पंचायत समितीच्या 18 गणांपैकी नागद, वाकद, पिशोर, निंभोरा, चिकलठाण, हतनूर, चिंचोली, औराळा, देवगाव, आदी 9 गणांमधून महिला उमेदवार निवडणुकीच्या रणधुमाळीत सहभागी होणार आहेत.
आचारसंहिता असल्याने मकर संक्रांतीनिमित्त वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू , तिळगूळ, हलवा देऊन हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे उमेदवारांनी सांगितले आहे. आचारसंहितेचा भंग होऊन कारवाईचा ससेमिरा नको म्हणून उमेदवार सावध पवित्रा घेत आहेत.