आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक, व्हाॅट्सअॅपवर 'अच्छे दिन', 'महंगे दिन'चा नारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला अाहे. मुहूर्त शोधून उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. पारंपरिक प्रचारासोबतच राजकीय पक्षांनी हायटेक प्रचार सुरू केला आहे. तरुणाई सोशल नेटवर्किंगला जास्त पसंती देते, हे लक्षात घेऊन फेसबुक, व्हाॅट्सअॅप तसेच मेसेज आणि ब्लाॅगचा वापर करून मतदारांना आपण योग्य उमेदवार असल्याचे भासवत असून 'अच्छे दिन'चा नारा देत आहेत.

वॉर्ड आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. वॉर्डातील मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी उमेदवार वेगवेगळे फंडे अवलंबत आहेत. काळानुसार प्रचाराचे स्वरूपही बदलले आहे. पूर्वी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जात होता. तसेच पॅाम्प्लेट वाटप केले जात असे. रिक्षावर स्पीकर लावून 'ताई माई अक्का, विचार करा पक्का..... मारा शिक्का' याबरोबर पक्षांच्या चिन्हावर स्लोगन तयार करून प्रचार केला जात होता. ही पद्धत आजही रूढ असली तरी आता हायटेक प्रचाराला पसंती दिली जात आहे. घरोघरी जाण्याऐवजी हायटेक प्रचार करण्याला राजकीय पक्ष प्राधान्य देत आहेत. यात सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात आहे. फेसबुक आणि व्हाॅट्सअॅपवर आपापल्या पक्षाची भूमिका मांडली जात आहे. फेसबुकवर आपले मित्र आणि वाॅर्डातील तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. दररोज प्रचाराचे फोटो अपडेट केले जात आहेत. उमेदवाराचे नाव, चिन्ह आणि आकर्षक स्लोगनबरोबरच केलेल्या कामाची पावती म्हणून विकासकामांचे फोटो टाकून पोस्ट तयार करण्यात येत आहे. वॉर्डात केलेली विकासकामे, दिलेले योगदान आणि आपण किती योग्य उमेदवार याचे अपटेड ठेवले जात आहे. विकासकामांबरोबर उच्चशिक्षित आणि प्रामाणिक असल्याचाही दावा केला जात आहे.


ग्रुपमध्ये राजकीय चर्चा
फेसबुकपेक्षाजास्त अपडेट राहणाऱ्यांची व्हाॅट्सअॅपवरही आपल्या ग्रुपमध्ये राजकीय चर्चा रंगत आहे. वॉर्डातील प्रचाराचे फोटो आणि पक्षश्रेष्ठींसोबतचे फोटो अपडेट केले जात आहेत. शिवसेना-भाजप 'अच्छे दिन' चा तर विरोधी पक्ष "महंगे दिन'चा प्रचार करत आहे. काही उमेदवारांचा एसएमएसच्या माध्यमातूनही प्रचार केला जात आहे.
प्रचारासाठी या मुद्द्यांवर भर..
१. स्थानिक उमेदवार
२. उच्चशिक्षित उमेदवार
३. प्रामाणिक उमेदवार
४. विकासकामे