आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Old EVM Machine Distroy By Election Comission In Aurangabad District

२००६ पूर्वीचे ईव्हीएम अद्ययावत नसल्यामुळे जिल्ह्यातील १४ हजार मतदान यंत्रे नष्ट करणार;

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मतदानासाठी २००६ पूर्वी तयार करण्यात आलेली सर्व मतनोंदणी (बी. यू.) व मतमोजणी (सी. यू.) यंत्रे नष्ट करण्याचा निर्णय आयोगाने घेतला अाहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण १४ हजार २४९ यंत्रे नष्ट करण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसांत तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही यंत्रे नष्ट केली जातील, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. या यंत्रांची मेमरी काढून ती वेगळ्या पद्धतीने नष्ट करणे, अन्य भागांची विल्हेवाट लावण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.
२००६ पूर्वी तयार झालेल्या यंत्रांमध्ये अत्याधुनिक माहिती ठेवता येत नाही. त्यात टायमरही नाही. नेमके मत कधी नोंदवले गेले हे ते यंत्र दर्शवत नाही. नव्या यंत्रांमध्ये अद्ययावत टायमर आहे. एखाद्या मतदाराने मत कधी म्हणजे नेमके किती वाजून किती मिनिटे व सेकंदांनी नोंदवले याचीही माहिती असते. नवे यंत्र आल्यानंतर जुने व नवे यंत्र एकत्र ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे जुने यंत्र नष्ट करण्याचा निर्णय आयोगाने घेतला.
त्याचबरोबर जुन्या यंत्रांची बॅटरीही जास्त वेळ टिकत नाहीत. त्यामुळे ही यंत्रे नष्ट केली जाणार आहेत. नव्या यंत्रांत टायमर तसेच अन्य अद्ययावत सुविधा आहेत. शिवाय नव्या यंत्रांची बॅटरीही जास्त वेळ चालते. जुन्या-नव्या यंत्रांचा घोळ होऊ नये, ही त्यामागील भूमिका असल्याचे समजते.
मनपा, सातारा परिषद निवडणूक नवीन यंत्रांवर
जिल्ह्यात पुरेशी यंत्रे
औरंगाबाद जिल्ह्याच्या ९ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या तीन हजारांपेक्षा कमी (२७४७) आहे. पुढील निवडणुकीच्या वेळी त्यात काहीशी वाढ होऊ शकते. या मतदान केंद्रांसाठी आवश्यक ती नवीन यंत्रे जिल्हा प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे जुनी यंत्रे नष्ट केल्याने काहीही फरक पडणार नाही. आगामी काळात महानगरपालिका तसेच नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सातारा-देवळाई नगर परिषदेची निवडणूक नव्या यंत्रांवरच होणार आहे. त्यासाठी ही यंत्रे पुरेशी आहेत. नजीकच्या जिल्ह्यात मतदान नसल्यामुळे गरज पडल्यास तेथून यंत्रे मागवली जाऊ शकतात.