आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Latest News In Divya Marathi

खर्चिक उमेदवारांची आयोगाकडून कोंडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-कोणत्याही उमेदवाराला अवास्तव खर्च करता येऊ नये, मतदारांना आमिष दाखवता येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उमेदवाराची दिवसभर व्हिडिओ चित्रीकरणासोबतच तपासणीसाठी जिल्ह्यात 9 फिरती पथके तैनात होणार आहेत. पथकांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र निरीक्षकही येणार आहेत. यापूर्र्वीच्या निवडणुकांपेक्षा या वेळी आयोगाने जागोजागी नाकेबंदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे उमेदवारांची कोंडी होणार आहे.
पथकामध्ये एक तहसीलदार, पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश असेल. ही पथके 24 तास कार्यरत राहतील. कोणत्याही ठिकाणी ते जातील, तसेच केव्हाही नाकेबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी करतील. त्यामुळे या वेळी उमेदवारांना पळवाटा शोधताना नाकीनऊ येणार आहेत. आयोगाच्या वतीने राज्यातील अधिकार्‍यांना गेल्या आठवड्यात पुणे येथे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
येथे होईल उमेदवारांची कोंडी : 27 पथके सर्वत्र कार्यरत राहतील. कोणत्याही वाहनांच्या तपासणीचे अधिकार त्यांना असतील. वाहनामध्ये अथवा व्यक्तीजवळ 50 हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम असेल तर ती जप्त होईल. बँक खात्यावर एक लाखापेक्षा जास्त व्यवहार झाल्यास होईल चौकशी, दहा हजार रुपयांपेक्षा किमती भेटवस्तूही जप्त होतील. कोणालाही दारू बाळगता येणार नाही. महिलांच्या पर्सही तपासल्या जातील. यासाठी आयएएस दर्जाचा स्वतंत्र निरीक्षक तैनात केला जाईल. दारू कारखान्यांवर असेल सीसीटीव्हीची नजर. दारू कोणी आणि किती खरेदी केली, याची नोंद केली जाईल.
50 हजारांवर रक्कम बाळगणे बेकायदा
निवडणूक आयोगाने नवीन गोष्टींची भर संहितेत घातली आहे. या काळात नागरिकांनी 50 हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम बाळगू नये. गरज असेल तर त्याची कागदपत्रे सोबत ठेवावी, अन्यथा ती रक्कम जप्त केली जाईल. उमदवाराने खर्चाच्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला तर कारवाई होईल. नागरिकांना आयोगाकडे तक्रार करता यावी यासाठी हेल्पलाइन सुरू केली जाईल. दोन दिवसांत क्रमांकही जाहीर करू. विक्रम कुमार, जिल्हाधिकारी.
लग्न, भंडार्‍यातील उपस्थितीही अडचणीची
एखाद्या भंडार्‍याच्या किंवा लग्नात उमेदवाराने भाषण ठोकले तर तो समारंभ उमेदवारानेच प्रायोजित केल्याचे गृहीत धरून सर्व खर्च उमेदवाराच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात अशा समारंभांना उपस्थित राहणे अडचणीचे ठरणार आहे.
खर्चाची अशी होईल नोंद
सभामंडप आणि खुर्चीसाठी किती शुल्क आहे, याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे उमेदवाराने कमी खर्च सादर केला तर आयोगाच्या नोंदीनुसार खर्च गृहीत धरला जाईल.
लवकरच हेल्पलाइन
निवडणूक काळात पैसे किंवा दारूचे वाटप होत असेल तर सामान्यांना तक्रार करण्यासाठी लवकरच हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. त्याचा क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून दिला जाईल. हेल्पलाइनवर होणार्‍या फोन कॉलची रेकॉर्डिंग केली जाणार आहे.