आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission Of Assembly Latest News In Divya Marathi

आयोगाला मतदानाची सत्तरी गाठण्याची आशा, मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी एसएमएस सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लोकसभेला 64 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यापूर्वीच्या विधानसभेला हा आकडा 62 टक्के होता. या वेळी आयोगाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आल्याने या वेळी हा आकडा किमान सत्तरी पार करेल, अशी अपेक्षा आयोगाला आहे. नेमके किती मतदान झाले, याचा अंदाज उद्या सायंकाळी येऊ शकेल, तर गुरुवारी सकाळी अधिकृत आकडा समजेल.

मतदार ओळखपत्र नसेल तर अन्य पुरावे आवश्यक :

आयोगाच्या वतीने प्रत्येक मतदाराला मतदार ओळखपत्र देण्याचा प्रयत्न झाला. मात्र तरीही अनेकांनी ओळखपत्र व पोलचिट मिळाली नसल्याची काहींची तक्रार आहे. अशा परिस्थितीत मतदारांकडे अन्य कोणतेही एक ओळखपत्र लागेल. यात पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे छायांकित पासबूक, चालक परवाना, पासपोर्ट, शासकीय कार्यालयाने दिलेले ओळखपत्र, केंद्र सरकारने दिलेले ओळखपत्र, निमशासकीय संस्थेचे ओळखपत्र.
ओळखपत्र आहे पण यादीत नाव नसेल तर :
तुमच्याकडे लोकसभा निवडणुकीच्या वेळी देण्यात आलेले मतदार ओळखपत्र असेल पण मतदार यादीत तुमचे नाव नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदार यादीत नाव असणे अनिवार्य आहे. मतदार ओळखपत्र नसेल तर अन्य ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. मतदार यादीत नाव आहे की नाही याची खात्री करण्यासाठी 9869889966 या क्रमांकावर संदेश पाठवून उत्तर मिळवता येते.
केंद्र बदलले तर काय?
आयोगाने अडीचशे मतदान केंद्रे वाढवली आहेत. त्यामुळे केंद्र बदलल्याचे ऐनवेळी लक्षात आल्यास आयोग काहीही करू शकणार नाही. नव्या केंद्रावर मतदान करणे एवढाच पर्याय असेल. त्यामुळे आयोगाचे संकेतस्थळ किंवा केंद्रावर जाऊन खात्री करावी लागेल.
केंद्रांवर असेल मदतनीस
दरम्यान, वाटप न झालेले ओळखपत्र, पोलचिटसह आयोगाचे कर्मचारी प्रत्येक केंद्रावर हजर असणार आहेत. ऐनवेळी तुम्ही स्वत:चे नाव तपासून तेथेच पोलचिट ताब्यात घेऊन मतदान करू शकता. मात्र यादीत नाव नसेल तर मात्र काहीही करता येणार नाही. कारण लोकसभा निवडणूक संपल्यापासून मतदार नोंदणीसाठी मोहीम हाती घेतली होती. याउपरही यादीत नाव नसेल तर ऐनवेळी तक्रार करून उपयोग नसल्याचे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शशिकांत हदगल यांनी स्पष्ट केले आहे. आचारसंहिता भंगप्रकरणी काही तक्रार असल्यास 1800-2339234 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.