आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वपक्षीयांची धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मतदारसंघात अनेक वर्षांपासून अडगळीत पडलेल्या जनतेच्या प्रश्नांना चालना देण्याच्या नावाखाली सर्वच पक्षांतील उमेदवार सत्तासंघर्षाच्या निर्णायक लढाईत स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्याची धडपड करत आहेत.
स्वबळावर निवडणूक जिंकण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांतील सुभेदारांनी प्रचार मोहिमेत मतदारसंघ ढवळून काढल्याने निवडणुकीच्या फडात सध्या कोणाचे पारडे जड आहे, याचा उलगडा १९ ऑक्टोबरला स्पष्ट होईल. या निवडणुकीत मतदारसंघात कायम होणारी बंडखोरीची पीडा स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेमुळे या वेळी टळली आहे. शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, बसपा या प्रमुख पक्षांतील उमेदवारांबरोबरच पाच अपक्ष असे एकूण तेरा उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत.
१५ वर्षांपासून शिवसेनेचा प्रभाव येथे टिकून आहे. या मतदारसंघात भाजपचे एकनाथ जाधव निवडणुकीत उतरले आहेत, तर सतत बंडखोरीची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पा. चिकटगावकर यंदा पक्षाकडून तिकीट मिळाल्याने निवडणूक लढवण्यासाठी जोशात उतरले आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी १ लाख २१ हजार १११ विक्रमी मते मिळवण्याचे मिशन येथे आखले आहे. गेल्या दोन निवडणुकांत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. काँग्रेसकडून गेल्या निवडणुकीत ३९ हजार मते घेणारे डॉ. दिनेश परदेशी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात काँग्रेस पक्षाने उतरवले आहेत. निवडणुकीत विजयाची सलग हॅट्ट्रिकची नोंद पूर्ण करून शिवसेनेचे आर. एम. वाणी चौकार मारण्याच्या तयारीत आहेत.
विकासकामांचा चोळामोळा
मनसेने या निवडणुकीत कल्याण दांगोडे यांना उमेदवारी दिली आहे. चिकटगावकर बंधूंशी राजकीय हाडवैर असलेले रामहरी जाधव यांनी शेकापचा झेंडा हातात घेत चिकटगावकरांना विजयापासून रोखण्यासाठी कंबर कसली आहे. या मतदारसंघात विकासकामे आणि योजनेचा चोळामोळा झाला आहे. मतदारसंघात विकासाचे चक्र ठप्प झाले आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या येथे कायम मानगुटीवर असल्याने सिंचनाचा प्रश्न कायम आ वासून सतावत आहे. दक्षिण भागातील गोदावरी नदीपात्रात वाळूमाफियांच्या टोळीने दरोडे घालून गंगथडीचा हा सुजलाम भाग उद्ध्वस्त केला आहे.
या भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. विकासाच्या बढाया मारणारे राजकीय नेते राजकारणाबरोबरच कंत्राटदारांच्या भूमिकेत येथे उतरल्यामुळे ग्रामीण भागाचा कमी व नेत्यांचा मात्र चांगलाच विकास झाल्याचे पाहावयास मिळते.
भाडेतत्त्वावरील इमारतीत शाळा
नेत्यांच्या भागीदारीमुळे शहर परिसरात सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महाग झाले आहे. एरवी जिल्ह्याच्या ठिकाणी नसलेल्या दरापेक्षा अवाजवी दरात भूखंड विक्रीचे व्यवहार जोरात सुरू आहेत. राजकीय पुढाऱ्यांच्या उदासीनतेमुळे येथील सरकारी शाळांची अधोगती झाली आहे. स्त्री शिक्षणाचे ढोल बडवणाऱ्या पक्षाच्या सरकारने शहरात मुलींच्या शाळेसाठी स्वतंत्र इमारत देण्याचे औदार्य अद्याप न दाखवल्यामुळे भाडेतत्त्वाच्या इमारतीत मुलींना शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
राज्याच्या एकूण कापूस उत्पादनात ४ टक्के कापूस उत्पादनाचा वाटा उचलणाऱ्या या तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव किंवा सुविधा देण्यासाठी कोणीच धडपड करत नाहीत. शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन अनुदान त्यांच्या पदरात पाडण्यासाठी उठाव होत नाही.